
केडीएमसी पथकाकडून परिसराची पाहणी करत तीन बांधकाम साईटवर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्याने पालिकेचा विकासकावर कारवाई बडगा… ओम डेव्हलपर्स, एकदंत डेव्हलपर्स आणि सर्वोदय कंबाईन या तीन बिल्डरांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. लोहारा येथे सोन्याचे दुकान फोडून 7 लाख 81 हजाराचे दागिने लंपास केले. लोहारा येथील जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्समध्ये चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. चोरीच्या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
आमदार संग्राम जगताप यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सोडली आहे. आता त्यांना नेटची मोस्क्यूटो टोपी घालूण फिरण्याची वेळ आली आहे. संजय राऊत ओरिजनल डूप्लिकेट ते स्व:तच ठरवतात. महिला रात्री मालिका पाहतात पण पुरूष सकाळी राऊतांची मालिका पाहतात.
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान दिले आहे. तसेच सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण करण्यात आले आहेत. तसेच मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी यातून हे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेत 300 ते 400 कोटींच्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहे. त्यांनी म्हटले की ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी उद्धव साहेबांना ऑफर दिली नाही तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी सदभावना व्यक्त केली आहे.
कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत.. या धरणाच्या उंची वाढीला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून मात्र विरोध वाढतोय.. याच पार्शवभूमीवर आज कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी अलमट्टी धरणा संदर्भात आढावा बैठक घेतली.. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते… बैठकीत इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात सापडणार असल्याची भीती व्यक्त केली.. तसंच सध्या देखील धरणामध्ये अतिरिक्त पाणीसाठा कर्नाटक सरकारकडून ठेवण्यात आला.. पाण्याचा विसर्ग वाढवला पाहिजे अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली.. कर्नाटक सरकार त्यांचे प्रशासकीय अधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी नेत्यांमध्ये समन्वय साधून यावर तोडगा काढणार असल्याचे शाहू छत्रपती बैठकीत म्हणालेत.
बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज सकाळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणात यापुर्वी धक्कादायक खुलासे करणारे वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी आज पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला असून महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह त्याच्या मुलाचा आणि गोट्या गितेचा हात असून गोट्या गिते हा सायको किलर आहे. त्याला तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे असं विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी म्हटलं आहे.
विधानभवानच्या गेटवर गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं आहे. गोपिचंद पडळकर यांनी आव्हाडांना शिवीगाळ केल्याचं म्हटलं जात आहे. पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं म्हटलं जात आहे.
मराठवाड्यात यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. मराठवाड्यामध्ये सध्या तरी पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. येथे दोन-तीन दिवसात पुणे शहर आणि शहरालगत मोठा पाऊस नाही. मात्र 20 तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढेल, अशी माहिती हवामान तज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे.
मोदी सरकारने 3 मोठे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान धन-धान्य योजनेला मंजूर देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे. तसेच एनटीपीसीला Renewal Energy साठी 20 हजार कोटी रुपये गुंतवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच सरकारने NLCIL ला Renewal Energy मध्ये 7 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यासाठी मंजूरी दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “ही चांगली गोष्ट आहे. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल मी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचे आभार मानतो. आम्ही अशी कोणतीही मागणी करत नाही आहोत जी आम्हाला यापूर्वी वचन दिले गेले नाही. आम्हाला अनेक वेळा सांगण्यात आले आहे की आम्हाला योग्य वेळी राज्याचा दर्जा दिला जाईल. आता, जम्मू आणि काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा देण्यात यावा.”
उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी होण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात ऑफर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट ऑफर देण्यात आली आहे. ‘उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही. आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी केली.
झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील जंगलात आज सकाळी 6.30 वाजता झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सब-झोनल नक्षलवादी कमांडर कुंवर मांझी उर्फ सहदेव मांझी यांना ठार मारल्याची माहिती सीआरपीएफने दिली. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 209 कोब्रा युनिट आणि झारखंड पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत एके-47 रायफल देखील जप्त करण्यात आली.
एटीएस टीम चांगूर बाबाला घेऊन लखनऊ मुख्यालयातून रवाना झाली आहे. चांगूरची पोलिस कोठडी रिमांड आज संपत आहे. एटीएस आज चांगूरला विशेष न्यायालयात हजर करू शकते. सुनावणीदरम्यान एटीएस रिमांड वाढवण्याची मागणी करेल. सात दिवसांच्या रिमांड दरम्यान एटीएसला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले.
अक्कलकोट येथे दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पुण्यात त्यांची भेट घेतली. सपकाळ यांनी गायकवाड यांच्यासोबत या संपूर्ण घटनेची सविस्तर चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली. यावेळी सपकाळ यांच्यासोबत काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्ता मजबूत आहे म्हणजे पक्ष मजबूत आहे. आता दोघं एकत्र आलो आहे. त्यामुळे कार्यकर्ता नेत्याला मोठं करतो. कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो. सर्व निवडणुका जिंकून देतो. पण जेव्हा काही लहान मदत लागते तेव्हा त्या नेत्याने खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं, असेही एकनाथ शिंदे म्हणाले
जळगावातील शिरसोली नाक्यावर मोठ्या प्रमाणावर मुदत संपलेल्या वेफर्सची पाकिटे रस्त्यावर फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्पमित्र जगदीश बैरागी यांना जुन्या जकात नाक्याजवळ ही मुदतबाह्य पाकिटे आढळून आली. त्यांनी तातडीने माहिती दिल्यानंतर महापालिकेने घटनास्थळावरून ती उचलून त्यांची विल्हेवाट लावली, अशी माहिती मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. गुजरातच्या लोठडा (जि. राजकोट) येथील वाडालिया फुड्स या कंपनीचे हे वेफर्स असून, त्यांची मुदत मार्च महिन्यातच संपली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य वेफर्स कोणी आणि कोणत्या उद्देशाने येथे फेकले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले. आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. या सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले
शिंदेंची सेनेची आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे. “ही प्रबोधनकारांपासून सुरु झालेली युती आहे. आंबेडकरी कार्यकर्त्याला देखील न्याय मिळाला पाहिजे असं वाटलं.तसेच शिंदे सर्वांना सोबत घेत पुढे जातात.म्हणून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला” असं वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलं आहे.
महाराष्ट्र राज्यातील मोठ्या संख्येनं होमिओपॅथि डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानात येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. होमिओपॅथि डॉक्टरांच्या नोंदणीला स्थगिती दिल्याने एॅलोपॅथिक डॉक्टरांच्या आणि सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी (IMA, MSRDA ) आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (MARD) याला तीव्र विरोध दर्शवला होता. IMA ने सरकारला पत्र पाठवून, होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्रात सराव करण्याची परवानगी दिल्यास लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते.
कल्याणमध्ये पाण्यासाठी मनसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मनसे कार्यकर्त्यांनी पाण्याची समस्या मांडण्यासाठी बनियन-टॉवेल आंदोलन केलं आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
ज्ञानेश्वरी मुंडेनी विषप्राशन केल्याची माहिती समोर आली असून त्यांना बेशुद्धावस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी आंदोलन सुरू होतं. महादेव मुंडेंच्या हत्येला 18 महिने पूर्ण झाल्यानंतरही आरोपी अटक होत नसल्याने मुंडे कुटुंबीय आक्रमक.
प्रवीण गायकवाडांवरील हल्ला निषेधार्हच, दीपक काटेंनी केलेलं कृत्य चुकीचं आहे. समाजाततेढ निर्माण करणं हे आमचं काम नाही,कोणत्याही आमदार, खासदाराचं या हल्ल्याला समर्थन नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागातील 14 गावांचा प्रश्न सुटणार आहे. 14 गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. 14 गावं चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू.
नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस ठाण्यातच तूफान हाणामारी झाली. अमलदार कक्षात झालेल्या वादाचं तूफान हाणामारीत झालं, अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीसही क्षणभर गोंधळले.
कराड – कोयना धरणातून पाणी विसर्ग वाढवला. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांवरून 3 फुट 6 इंच उघडून 9300 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु केला. कोयना नदीमध्ये एकूण 11400 क्युसेक पाणी विसर्ग सुरू झाला.
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी “ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या” वतीने जनआंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान समितीने साखळी फलक निदर्शने करत लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बीडमध्ये महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना अठरा महिन्यांनंतरही अटक झाली नसल्याने, महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आता आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे, ज्यामुळे या प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे.
काही भागात पाऊस नसल्याने आणि पेरण्या पूर्ण झाल्याने बैल खरेदी विक्रीची उलाढाल झाली कमी. दर आठवड्याला एक ते दीड कोटी रुपयांची होणारी उलाढाल 70 ते 80 लाखावर. बैल जोडीचे भाव कमी झाले. बैलजोडीचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे कुटुंबाकडून पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले. मुंडे कुटुंबाकडून आक्रोश. 18 महिन्यांपासून आरोपी अटक होत नाहीत आणि आम्हाला अडवता कशाला?. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, आई वडील आणि मुले सर्वजण आक्रमक. पोलिस आणि मुंडे कुटुंबामध्ये शाब्दिक चकमक..
“हा हल्ला माझ्यावर नव्हे, एका विचारावर. या घटनेमागचा मास्टरमाइंड शोधा. राजकीय दृष्टया भाजपला आमची विचारधारा धोक्याची वाटते. दीपक काटेवर मकोका लावणं गरजेच होतं. आमच्या बंदोबस्ताचा टास्क काटेला दिलाय. हल्ल्यानंतर मी पोलिसांना सहकार्य केलं” असं प्रवीण गायकवाड म्हणाले.
“दीपक काटे बावनकुळेंना गॉडफादर म्हणतो. गुन्हेगाराला जामीन मिळवून त्याला टास्क देण्यात आला. दीपक काटेचा गर्व असं बावनकुळे म्हणालेले. पुणे एअरपोर्टवर दीपक काटेकडे शस्त्रास्त्र सापडली होती. गंभीर गुन्हेगार असतानाही भाजपमध्ये पद दिलं” असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावात शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या एका बैठकीत तणाव निर्माण झाला. जमिनी मोजणीसंदर्भातील नोटिसा न स्वीकारल्याने कळमनुरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या एका महिला सरकारी अधिकाऱ्याला, एका शेतकऱ्याने सरकारला हरामखोर संबोधल्याने राग अनावर झाला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेताच, संबंधित महिला अधिकारी संतापून बैठकीतून निघून गेल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली.
ठाण्यातील घोडबंदर रोडवर आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गायमुख घाटाजवळ ठाण्याच्या दिशेने एका वाहनाने डिव्हायडरला धडक दिल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यातच, ब्रह्मांड सिग्नलजवळ दोन अवजड वाहनांमध्ये अपघात झाल्यामुळे कोंडीत आणखी भर पडली. मेट्रोच्या कामादरम्यान सिमेंट मिक्सर वाहनाच्या ऑपरेटरला दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुहेरी अपघातांमुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक विभागाकडून (Traffic Department) रस्ता पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते मंत्रालयपर्यंत खांद्यावर नांगर घेऊन चालणारे सहदेव होणाळे यांना काल ठाणे जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर मुंबई पोलीस त्यांना पोलीस व्हॅनमधून आझाद मैदानला घेऊन जाणार आहेत. कर्जमाफी, शेतीला हमीभाव, सातबारा कोरा अशा विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी ते पायी चालत आले होते. पायी चालत आल्यामुळे त्यांच्या पायाला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत.
अभिनेत्री कियारा अडवाणीने मुलीला जन्म दिला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तिने प्रेग्नंसी जाहीर केली होती. कियाराने 2023 मध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न केलं होतं.
धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी पोषण आहार पुरवणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी विधिमंडळामध्ये केली.
एकनाथ शिंदे यांचे माजी खासदार हेमंत गोडसे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. पक्षातील गटबाजीमुळे गोडसे नाराज असल्याची चर्चा आहे. हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकांपासूनच अस्वस्थ होते. लोकसभा निवडणुकीत तिकीट द्यायला उशीर झाल्याने गोडसे यांचा पराभव झाल्याची भावना आहे. नाराज गोडसे पुढे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीत आणावी, यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर देहू देवस्थानने आळंदीकरांचे हे निमंत्रण स्वीकारले असून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या रविवारी २० जुलैला आळंदीत माऊलींच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे तुकोबारायांचा पालखी आळंदीत मुक्काम करणार आहे
नाशिकचे काही वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात… 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती… मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद शहरांमध्ये गुप्त तपास सुरू असल्याची माहिती… TV9 च्या बातमीनंतर राज्यात खळबळ… बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी स्वतःचा मोबाईल फॉरमॅट केल्याची माहिती…. काही अधिकारी-राजकीय मंडळींनी संबंध झाकण्यासाठी परस्पर समन्वय केल्याची देखील सूत्रांची माहिती… व्हिडिओ कॉल्स, हॉटेल भेटी आणि पैसे व्यवहारांचे पुरावे तपासात समोर येण्याची शक्यता… संपूर्ण घटनेनं राज्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ
120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या बाजूने कौल… पदाधिकाऱ्यांसोबतच्या प्रश्नोत्तराच्या तासात अनेकांनी ठाकरे गटासोबत युती करावी असे मत मांडले… ‘तुमच्या मनासारखं करू, पण थोडे थांबा,’ राज ठाकरेंकडून सबुरीचा सल्ला… सूत्रांची माहिती
गोंदिया : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या चार दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असता. रात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून आज सकाळ पासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरणात दिसून आले पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे…..