Nashik: दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 2 मुले रक्तबंबाळ, उपचार सुरू

| Updated on: Nov 21, 2021 | 11:00 AM

नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहेत.

Nashik: दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप; 2 मुले रक्तबंबाळ, उपचार सुरू
नाशिक जिल्ह्यातमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन मुले जखमी झाली आहेत.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या कळमुस्ते दुगारवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात बिबट्याचा वावर नवा नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने चक्क मुलांना उचलून नेण्यापासून ते गावात येऊन माणसांवर हल्ला करण्याचे प्रकार केले आहेत. त्यामुळे पंचक्रोशीत धास्ती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथे असाच प्रकार घडला होता.

अन् घातली झडप

दुगारवाडी परिसरातील कळमुस्ते ठिकाणी भिवाजी गोविंद सोहळे (वय 12) आणि विशाल सुरूम (वय 8) हे दोघे मुले सकाळी नैसर्गिक विधीसाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, त्यांनी आरडाओरडा सुरू केला. हा गोंधळ पाहून गावकऱ्यांनी धाव घेतली. यावेळी मोठा जमाव जमला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. यातील एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्याला बिबट्याने रक्तबंबाळ केले आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या मुलाची प्रकृती ठीक आहे. या हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत असून, त्यांनी सापळा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.

यावर्षी तिघे ठार

बिबट्याच्या हल्ल्यात यंदा नाशिक जिल्ह्यात तिघांनी जीव गमावला आहे. त्यात दरेवाडी येथील दहा वर्षांचा मुलगा, खेड येथील दहा वर्षांचा मुलगा आणि खैरगाव येथील ऐंशी वर्षांच्या आजीचा समावेश आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्यावर्षी इगतपुरी तालुक्यातल्या आधारवड येथे दहा वर्षांचा मुलगा, पिंपळगाव मोर येथे अकरा वर्षांची मुलगी, कुरुंगवाडीत ऐंशी वर्षांच्या आजीबाई, तर चिंचलखैरे येथे दहा वर्षांचा मुलगा ठार झाला होता. जवळपास चार जण जखमी झाले होते. या काळात दहा बिबट्यांना पकडण्यात आले होते.

दोन वर्षांत 12 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नाशिकमधील पाच, इगपुरी तालुक्यातील सहा आणि दिंडोरी येथील एकाचा समावेश आहे. तर पेठ येथे रानडुक्कराच्या हल्ल्यात एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, वनविभागाने सापडे लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी होत आहे.

इतर बातम्याः

Nashik: साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

Video : ‘आधी जोरदार टीका, मग एकाच सोफ्यावर मनमोकळ्या गप्पा’, नाशिकच्या लग्न सोहळ्यातील खास राजकीय चित्र