राज्यात हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरेंनीच स्वीकारलं होतं, सामंतांचा मोठा दावा

राज्यात सध्या हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यात हिंदी सक्तीचं धोरण उद्धव ठाकरेंनीच स्वीकारलं होतं, सामंतांचा मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 26, 2025 | 7:47 PM

राज्यात सध्या हिंदी भाषेची सक्ती आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारले होते, असा दावा त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले सामंत?  

राज्यात शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारले होते. डॉ. माशेलकर समितीचा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत, असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता, मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील शिवसेना ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक हिंदी भाषेवरुन राजकारण केले जात आहे, अशी घणाघाती टीका उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ते बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदीची सक्ती कुठेही करायची नाही आणि हिंदी अनिवार्य देखील करायची नाही, ही शासनाची भूमिका आहे. मात्र महापालिका निवडणूक जवळ आल्याने काहीजण या मुद्द्याचे राजकारण करत आहेत, असा टोला मंत्री सामंत यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाला लगावला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी एक कार्यगट स्थापन केला होता. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीने इयत्ता पहिले ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत, असा अहवाल सरकारला सादर केला होता. तो अहवाल 27 जानेवारी 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता, मग त्यावेळी राज्यात शैक्षणिक धोरण 2020 च्या धोरणानुसार बारावीपर्यंत हिंदी सक्तीबाबत शिवसेना ठाकरे गटानं का हरकत घेतली नाही, असा सवाल मंत्री सामंत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात हिंदी सक्ती लागू झाली तेच आता हिंदी भाषेबाबत मोर्चा काढत आहेत, ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका मंत्री सामंत यांनी केली आहे. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने काहीजण भावनिक साद घालून मराठी आणि हिंदी भाषेवरुन राजकारण करत आहेत, अशी टीकाही यावेळी मंत्री सामंत यांनी केली.