शिवजयंतीच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजेंची रोखठोक भूमिका, म्हणाले….

| Updated on: Feb 14, 2021 | 2:49 PM

शिवाजी महाराज आज असते तर त्यांनीसुद्धा असाच विचार केला असता,' असं उदयनराजेंनी म्हटलंय. (Udayanraje Bhosale Shivaji Maharaj birth anniversary)

शिवजयंतीच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजेंची रोखठोक भूमिका, म्हणाले....
Follow us on

सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती (Shivaji Maharaj birth anniversary) साजरी करण्यासाठी राज्य सरकारने निर्बंधासोबतच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. निर्बंध घातल्यामुळे भाजपने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, याच मुद्द्यावर सामंजस्याची भूमिका घेत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले  (Udayanraje Bhosale) यांनी शिवाजी ‘महाराजांनी लोकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनीसुद्धा असाच विचार केला असता,’ असं म्हटलंय. ते साताऱ्यात ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Udayanraje Bhosale first comment on Shivaji Maharaj birth anniversary guidelines)

“कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांनी जवळची लोकं गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती ही झालीच पाहिजे. परंतु आपल्या लोकांची काळजी घेणे ही आपली आणि शासन अशा सर्वांचीच जवाबदारी आहे. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी सुद्धा असाच विचार केला असता. त्यांनी लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे शिवजयंती साजरी जरूर करा, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या,” असे उदयनराजे भोसले म्हणाले.

राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे 

छत्रपती शिवाजी महाराज यांची येत्या 19 फेब्रुवारी रोजी 390 वी जयंती आहे. दरवर्षी या दिवशी शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस शिवप्रेमींसाठी एक उत्सव असतो. मात्र, या वर्षी राज्यावर तसेच संपूर्ण देशावर कोरोना संसर्गाचं सावट असल्यामुळे या वर्षीची शिवाजी महाराजांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने कले आहे. त्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वेसुद्धा जारी केलेले आहेत.

मात्र, दुसरीकरडे सरकारच्या या निर्णयाचा भाजपने कडाडून विरोध केला आहे. ‘सरकार राणीच्या बागेत पेंग्विन पाहायला लोकांना आमंत्रण देते, पण शिवजयंतीसाठी एकत्र जमण्याला सरकार परवानगी देत नाही, अशी बोचरी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. तसेच मराठा क्रांती मोर्चानेसुद्धा ठाकरे सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भाजपच्या या भूमिकेनंतर उदयनराजेंच्या वरील प्रतिक्रियेला विशेष महत्त्व आले आहे.

जयंतीचे ऑनलाईन प्रक्षेपण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, असं गृहविभागाने परिपत्रकात म्हटलं आहे.

बाईक रॅली, प्रभात फेरीला मज्जाव

तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं त्यात म्हटलं आहे.

इतर बातम्या :

पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारीपासून याचचं हं , पण शिवजयंतीला नाही; आशिष शेलारांचा शिवसेनेला सणसणीत टोला

औरंगजेबी ‘शिवद्रोही’ सरकारचा धिक्कार; ‘बंदी’ फतवा मागे घ्या, अन्यथा…; संभाजी ब्रिगेडचा थेट इशारा

(Udayanraje Bhosale first comment on Shivaji Maharaj birth anniversary guidelines)