साताऱ्याची जागा अजून जाहीर नाही, उदयनराजे म्हणतात, कधी तरी…

लोकसभा निवडणुकांची तयारी चांगलीच जोरात सुरू झाली आहे. मात्र तरीही अजून राज्यातील साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स काही संपलेला नाही. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्याचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. खुद्द उदयनराजे यांनीही उघडपणेच येथून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. साताऱ्यात नेमकी लढत कोणाची होणार याकडेच सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

साताऱ्याची जागा अजून जाहीर नाही, उदयनराजे म्हणतात, कधी तरी...
| Updated on: Apr 08, 2024 | 9:03 AM

लोकसभा निवडणुकांची तयारी चांगलीच जोरात सुरू झाली आहे. मात्र तरीही अजून राज्यातील साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स काही संपलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या जागेवर कोण निवडणूक लढवेल ? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्याचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. खुद्द उदयनराजे यांनीही उघडपणेच येथून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तरीही अद्याप उदयनराजे यांच्या नावाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे साताऱ्यात नेमकी लढत कोणाची होणार याकडेच सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

याचदरम्यान उदयनराजे यांनाही याबद्दल थेट प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता रोखठोक उत्तर दिलं. सारखंसारखं तिकिटाचा विषय कशाला काढता, लोकसभेची जागा कधी तर जाहीर करावीच लागणार आहे, असे ते म्हणाले. ‘ देव आपण कोणी बघितला नाही,छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या बद्दल वाद निर्माण केला जातो, लोकसभेची जागा कधी तर जाहीर करावीच लागणार आहे’ असे उदयनराजे यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजी महाराज शूरता, शौर्य याचं प्रतीक होते, मरण पत्करलं पण शरण कधी गेले नाही. एका बाजूला संपूर्ण राज्यकारभार हाताने दुसऱ्या बाजूला बुधभूषण सारखे अनेक ग्रंथ वेगवेगळ्या भाषेत त्यांनी लिहीले. त्यांच्या तोडीचा पृथ्वीवरती दुसरा कुठेही योद्धा झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांना लाभला आणि जगाव कसं आणि तत्वं कशाला म्हणतात. हे आणि अनेक बरेच पैलू त्यांचे जे होते आपल्याला शिकायला मिळतात. सर्वधर्मसमभावाची जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती तीच त्यांनी संपूर्ण पुढे नेली.आज शूरता वीरता याची आठवण येते. पुण्यातील वढू येथे ते बोलत होते. या ठिकाणी स्मारक आहे, त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा आणि शासनाने अधिकृत रित्या इतिहास वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित करावं अशी मागणी केली. सगळीकडे इतिहास पोहचला पाहिजे, तरुण पिढीला मार्गदर्शन मिळेल, चांगलं आयुष्य कसं होईल ही इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

साताऱ्याच्या जागेवरून महाविकास आघाडीची भूमिका काय ?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या जागेवर कोण निवडणूक लढवेल? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाला सुटली आहे. कारण या मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे आहेत. असं असलं तरी श्रीनिवास पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे साताऱ्याच्या जागेवर कोण उमेदवार असेल? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसेल यांना साताऱ्याचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्याविरोधात या मतदारसंघात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण त्यांचं नावही आता मागे पडताना दिसत आहे. कारण शरद पवार गटाने पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. ही अट पृथ्वीराज चव्हाण यांना मान्य नसल्याची माहिती समोर येत आहे.