
संपूर्ण राज्याताल प्रतिक्षा असलेली उद्धव (Uddhav Thackrey) आणि राज (Raj Thackrey) या ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा पहिला भाग अखेर रिलीज झाला आहे. शिवसेना खासदर संजय राऊत आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दोघांनाही प्रश्न विचारत बोलतं केलं. संजय राऊत यांनी त्या दोघांना एकत्र येण्यास लागलेला काळ, मुंबई, राजकारण, भाजप, मोदी अशा अनेक विषयांवर प्रश्न विचारले. तर एक मुंबईकर म्हणून, कॉमन मॅनचा प्रतिनिधी म्हणून महेश मांजरेकर यांनी राज व उद्धव यांना मुंबईची सध्याची दुरावस्था, इथले प्रॉब्लेम्स, हवेची घटलेली गुणवत्ता अशा अनेक विषयांवर सवाल विचारले.
मुंबईत बाहेर पडताना लाज वाटते असं म्हणत एखाद्या फुग्यात त्याच्या क्षमतेपेक्षा पाचपट हवा भरली तर कसं होईल, तशी मुंबईची अवस्था आहे असं ते म्हणाले. वाढत्या विकासापायी मुंबईची जी दुरावस्था झाली, त्यावरून ताशेरे ओढत आता विकासचं नको, अशी उद्विग्न भावनाही मांजरेकर यांनी व्यक्त केली.
पाचपट हवा भरल्यावर फुगा फुगतो तशी मुंबई झालीये, ही मुंबई डिकन्जेस्ट कधी होणार ? या मांजरेकरांच्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं. ” मुंबईत आज जेवढं प्रदूषण आहे, हवेचा निर्देशाकं जो खराब आहे, तो आधी कधी होता का ? असा सवाल मुंबईकर म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपवाल्यांनी जी काही विकासाच्या प्रचाराची होर्डिंग्ज लावलीत, ही विकासाची गती नाही. ह्यांची विनाशाची गती आहे”. नियोजनशून्य विकास अशी टीका करतानाच या विकासामुळेच त्रास होत असल्याचं त्यांनी सुनावलं.
जो कर भरता, त्यातून काय मिळतं… प्रदूषण
” आपल्याला नेमकं हवंय काय हेच ह्या सरकारला कळलेलं नाही. जिथे बघाव तिथे रस्ते खोडलेत, मोठमोठ्या इमारती उभ्या आहेत, मेट्रो आणि पूल दिसत आहेत. हे सगळं हवं आहेच, पण ते सर्व एकाच वेळी करायला घेतलंय. मुंबईच्या खर्चाचाही ताळमेळ बसवला गेला पाहिजे, नाहीतर आतासारखी परिस्थिती ओढवते. मुंबईकर म्हणून तुम्ही जो कर भरता, त्याच्यातून तुम्हाला काय मिळतं… प्रदूषण.” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
घरचा रास्ता थेट हॉस्पिटलपर्यंत जातो, हा विकास नव्हे – उद्धव ठाकरे
विकास म्हणजे तरी काय ? तुमच्याकडं काय छान रस्ता आहे. तो सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो. ह्याला विकास नाही म्हणत. कमीत कमी हॉस्पिटल असणं आणि आयुष्य चांगलं असणं असा विकास पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.
आता विकास नकोच
माझं तर म्हणणं आहे की, विकास नकोच आता असं मांजरेकर त्यावर म्हणाले. त्यावर ” नियोजनशून्य विकासा”मुळे अशी मानसिकता झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. होय हे आम्ही केलं! अशी होर्डिंग आम्ही लावली. त्यात शाळेचा दर्जा, पाण्याचा दर्जा , कोस्टल रोड हे सगळं आलं. पण आम्ही वाट्टेल ते केलेलंन नाही. सध्या सगळं वेडवाकडं आहे. सगळे धुळीचे आणि सिमेंटचे कण फुप्फुसात जातायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुंबईत आपण जो श्वास घेतो, त्यातून ऑक्सिजनपेक्षा जास्त कार्बन घेतो,असं मांजरेकर म्हणाले. त्यावर राज ठाकरे यांनीही चोख उत्तर दिलं. “त्याचं मूळ कारण विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सुरू आहेत ते आहे” असं ते म्हणाले. मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबईत आपण गेलो तर दिसतं की प्रचंड मोठय़ा प्रमाणावर रिडेव्हलपमेंट सुरू आहे. झाडं तोडतायत. होतं काय की, आपल्याकडं डीपी बनतो, पण टाऊन प्लानिंग होत नसल्याची टीका त्यांनी केली. मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला. पुण्याला तो वेळ मिळणार नाही, पुणं लवकरात लवकर बरबाद होईल असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.