फक्त महापालिका नाही, महाराष्ट्रही काबिज करु, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
वरळीतील ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी लादण्याच्या निर्णयाचा निषेध केला. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले आणि शिवसेनेच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचे सरकारवर जोरदार टीका केली आणि मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

मुंबईत आज वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती मागे घेतल्याच्या निर्णयानंतर आयोजित या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित करताना एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. दरवेळी संकट आलं की एकत्र येतो, संकट गेल्यावर भांडतो. आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
‘म’ म्हणजे ‘मराठी’ नव्हे, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ असे जे बोलले जात आहे, त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. “अरे ‘म’ महाराष्ट्रही काबीज करू!” आज निवडणुका नसून, आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की जे दिल्लीचे पाय चाटतात त्यांना ‘बाटगे’ म्हटले पाहिजे. मुंबई मराठी माणसाने मिळवली, जेव्हाचे सत्ताधारी मुंबई महाराष्ट्राला द्यायला तयार नव्हते. ‘यावश्चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,’ असे स.का. पाटील यांनी म्हटले होते, पण मराठी माणसाने त्यांना झुकवले, असे आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.
“माझ्या डोक्यात एक विचार आहे. यांचं हे काही सुरू आहे. तेव्हा काश्मीरमध्ये ३७० कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यांनी घोषणा दिली: ‘एक निशाण, एक विधान, एक संविधान.’ बरोबर आहे. तिरंगा एकच हवा, भाजपचं भांडी धुवायचं फडकं नको. हिंदू हिंदुस्थान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती मान्य नाही,” असे मत उद्धव ठाकरेंनी ठामपणे मांडले.
ती गुंडगिरी नाही होत का
“मग उद्धव ठाकरे एवढं काम करत होता, तर सरकार का पाडलं?” मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केल्याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर काही लोक कोर्टात गेले, “ती गुंडगिरी नाही होत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’ हे त्यांचे धोरण असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे आणि आपण जेव्हा एकत्र होतो, तेव्हा अनेक गोष्टी केल्या. आता पुन्हा एकत्र आलो आहोत. १४ वर्षांत तुम्ही मराठी माणूस घालवला, उद्योगधंदे, मोठे ऑफिस घालवले, कुठे गेले? तेवढाच हिंदुस्तान आणि तेवढेच हिंदू आहेत का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. आम्ही सर्व करत होतो, तुम्ही गद्दारी केली आणि आमचे सरकार पाडले. तुमचे मालक तिकडे बसले, त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहात,” असे म्हणत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
‘म’ महाराष्ट्रही काबीज करु
आपल्या डोळ्यादेखत लचके तोडले जात असताना, किती काळ सहन करायचे. प्रत्येकवेळी काय झालं की भांडाभांडी करणार? आम्ही एकत्र आल्यावर सत्तेसाठी आलो. यांचा ‘म’ मराठीचा नाही, ‘म’ महापालिकेचा आहे,” असे म्हटलं जातं. त्यावर उद्धव ठाकरेंनी “अरे, ‘म’ महाराष्ट्रही काबीज करू.” असे म्हटले. “आज निवडणुका नाहीत. सत्ता येते जाते. आपली ताकद एकजुटीत हवी. दरवेळी संकट आलं की एकत्र येतो, संकट गेल्यावर भांडतो. आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही. गेल्या विधानसभेत त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ केले.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.