
शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक हे मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी सध्या अनेक शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आता वांद्र्यासह ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात वांद्र्यात लावलेल्या एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्र यांनी वांद्रे रेक्लमेशन परिसरात एक बॅनर लावण्यात आला आहे. त्यांनी लावलेल्या या बॅनरने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. अखिल चित्रे यांनी लावलेल्या या बॅनरवर कोविडमध्ये कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री लाभला, सर्वांना जपणारा बाळासाहेबांचा पुत्र शोभला…” असा आशय लिहिण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या बॅनरद्वारे अखिल चित्रे यांनी उद्धव ठाकरे यांनी कोविड-१९ महामारीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याला अधोरेखित करण्यात आले आहे. त्या कठीण काळात त्यांनी राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली, याबद्दलचे भाष्य केले आहे. सर्वांना जपणारा बाळासाहेबांचा पुत्र शोभला…असेही यात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिवसैनिकांच्या मनातील भावना समोर आल्या आहेत.
uddhav thackeray banner
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल मध्यरात्री केक कापण्यात आला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, आमदार वरुण सरदेसाई आणि विभागप्रमुख अनिल परब यांच्यासह वांद्रे पूर्व येथील पदाधिकारी उपस्थित होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी दिवसभर शिवसैनिकांची गर्दी उसळणार असून, ते आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचे तसेच महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान वांद्रे रेक्लमेशन येथील या बॅनरने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या उत्साहात आणखी भर घातली आहे. या बॅनरमुळे त्यांच्या नेतृत्वाला आणि कोविड काळातील त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला आहे.