उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार? मंगळवारी आमदारांची बैठक, पण त्यापूर्वीच बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आधी खासदारांनी साथ सोडली, त्यानंतर सचिन अहीर यांनी देखील धक्का दिला, आता उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का बसणार? मंगळवारी आमदारांची बैठक, पण त्यापूर्वीच बड्या नेत्याच्या विधानाने मोठी खळबळ
Uddhav Thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 05, 2026 | 3:32 PM

काही दिवसांपूर्वीच सचिन आहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे  अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि  मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे, संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? 

आमदारांची बैठक वारंवार त्यांनी बोलवली पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. जर त्यांची काम करता आले तर ती केली पाहिजेत.  पण बैठक बोलावून जर तुम्ही त्यांना दम देणार असाल तर ते आमदार तुमच्याकडे टिकणार नाहीत हे सत्य आहे. आमदारांना तुमची हुकूमशाही नको लोकशाही मार्गाने त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता पाहिजे आहे, आणि हे प्रश्न सोडवणारा नेता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आहेत, हे सर्वजण जाणतात म्हणून भविष्यात काय होईल ते आता सांगणं उचित नाही, असं यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान शनिवारी देखील बोलताना आता ऑपरेशन 3.0 सुरू झालं आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं होतं, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान वरळीतून लढण्याचा आदेश मिळाला तर निवडणूक लढेल असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे, त्यावर देखील आता संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सचिन अहिर यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ते एकनाथ शिंदे साहेब घेतील,  सचिन अहिर वरळीमध्ये लोकप्रतिनिधी होते, त्यांचे काम करण्याची पद्धत लोकांना माहीत आहे. ते गेले तीस वर्ष विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये आहेत. त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत कसा आणि कुठे घ्यायचा? याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.

वरळीच्या सातबाऱ्यावर कोणाचं नाव नाही, असंही सचिन अहिर यांनी म्हटलं होतं, त्यावर देखील संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सचिन अहिर यांनी हे जे वक्तव्य केलं आहे याला मॅच्युरिटी म्हणतात, त्यांनी सांगितलं की वरळीच्या सातबाराऱ्यावर कोणाचं नाव नाही, असं यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.

 

 

Follow Us