
Uddhav Thackeray : गणेशोत्स्व जल्लोषात साजरा करा. गणपती बाप्पा आपल्याकडे बघतोय हे एक बंधन जरी असलं तरी कोणत्याही मर्यादेचं उल्लंघन होणार नाही, असे मत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी मुंबई ते कोकण रस्त्यावरील खड्ड्यांवरून राज्य सरकारला घेरलं. जनता तुमचा बाप आहे, त्या जनतेचाच हा पैसा आहे. खड्डे बुजवा तोपर्यंत दंड भरणार नाही, अशी भूमिकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी घेतली.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात आज गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी बैठक घेतली. याच बैठकीचे नंतर सभेत रुपांतर झाले. याच सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई-कोकण रस्त्यावरून राज्य सरकारला घेरले. मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत, तेवढा दंड लावा. हे खड्डे जोपर्यंत बुजवणार नाही तोपर्यंत आम्ही दंड भरणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीसांना सांगा. जनता तुमचा बाप आहे. याच जनतेचा हा पैसा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
पुढे त्यांनी गणेशोत्सवावरही भाष्य केलं. आमच्या ऊत्सवावर बंधनं आणाल तर आम्ही ती तोडून टाकू. डीजे लावायचा नाही असा नियम आला हरकत नाही आम्ही डीजे लावणार नाही. गणपती बाप्पा पाहतोय हे लक्षात ठेवून सण साजरा करा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. मंडप बांधायचा कुठे हा प्रश्न आहे. एमआयजी कॉलिनीत टॉवरच्या रुपात राक्षस ऊभे राहिले आहेत. त्यामुळे ऊत्सव साजरे कुठे करायचे हा प्रश्न आहे, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
चोरून आलेली सत्ता आपल्याला काय न्याय देणार. अडचण आली तर शिवसेना डगमगणार नाही. गणोशोत्सवाची परंपरा यापुढेही सुरूच राहील. मध्ये येणारे जाणारे असतात, हे नातं असंच कायम ठेवुया, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. विशेष म्हणजे मुंबई महापालिका आपली होती. भविष्यातही आपलीच असणार, असा निर्धारही यावेळी त्यांनी बोलून दाखवला.
मराठी हिंदी वादावरही त्यांनी भाष्य केले. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही म्हणून आम्ही आंदोलन केले. हा निर्णय नंतर मागे घेतला गेला आणि एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे आहेत. ते अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांचा भाषेशी काहीही संबंध नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.