उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, एकनाथ शिंदेंनी थेट नगराध्यक्ष फोडला; असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Thackeray vs Shinde : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. कोकणातील एका नगराध्यक्षासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.

उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, एकनाथ शिंदेंनी थेट नगराध्यक्ष फोडला; असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
atul chougule joins eknath shinde shiv sena
Image Credit source: Google
| Updated on: Jun 24, 2026 | 6:59 PM

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता दोनच दिवसांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. कोकणातील एका नगराध्यक्षासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश

रायगडमधील पक्षप्रवेशाबाबत एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले की, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील उबाठा गटाचे नगराध्यक्ष ऍड.अतुल चौगुले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काल शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह दक्षिण रायगडचे माजी जिल्हाप्रमुख विजयराज खुळे यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

यावेळी त्यांच्यासह, विक्रांत राऊत, साकार जाधव, प्रीतम श्रीवर्धनकर, लखन भाटकर, पायल भाटकर, मयुरेश मयेकर, प्रतीक पालवे, नियती जाधव आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. यासोबतच माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, उपाध्यक्ष अजितकुमार पिसाळ, माजी नगरसेविका भारती पिसाळ, उपाध्यक्ष हनुमंत ठाकूर, हिराजी निंबाळकर, शर्मिला पवार, वॉर्ड अध्यक्ष ज्योती पुजारी, कल्याणी बोंद्रे, युवक अध्यक्ष अनिल पुजारी, जितेंद्र खोत, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष ऑस्कर किणी यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या सर्वांचे देखील पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

एकनाथ शिंदेंची ताकद वाढली

यावेळी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, माजी महापौर दत्ता दळवी, उपनेत्या सुवर्णा करंजे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, कोकणातील या पक्षप्रवेशामुळे श्रीवर्धनमधील शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. याचा आगामी काळात पक्षाला मोठा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून पक्ष आता कमकुवत झाला आहे.

Follow Us