
Uddhav Thackeray Speech : फडणवीस सरकारने केलेल्या पॅकेजची घोषणा ही आतापर्यंतची सर्वात मोठी थाप आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सोबतच सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे 31 हजार कोटी रुपयांचे नाही, तर हे पॅकेज फक्त साडे सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज आहे, असा दावाही ठाकरे यांनी केला. मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातून पूर्ण खरीप हंगाम गेला आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. विरोधकांनी मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप केलाय. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीला घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आहे. या मोर्चानंतर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना ठाकरे उत्तर देत होते.
यावेळी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. आपल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीविषयी एकही शब्द काढला नाही. त्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची पंतप्रधानांना कल्पना देण्यात आली होती की नाही, या मला माहिती नाही. मोदी शेतकऱ्यांबद्दल एकही शब्द बोलले नाही. पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत असं पॅकेज जाहीर केलं गेलं, असा आरोप ठाकरे यांनी केला.
तसेच, सरकारने 31 हजारांचं पॅकेज जाहीर केलं. हा आकडा पाहून सर्वांनाच वाटलं की अरे बापरे ही तर फारच मोठी मदत झाली. पण प्रत्यक्षात ही मोठी मदत नाही. कृषीविषयक तज्ज्ञ, आर्थतज्ज्ञ या मदतीचे विश्लेषण करत आहेत. याच तज्ज्ञांच्या विश्लेषणातून मला हे समजलं आहे की सरकारने केलेली ही मदत फक्त साडे सहा हजार कोटी रुपयांची आहे, असा मोठा दावा ठाकरे यांनी केला.
पीक विम्यासाठी आम्ही पाच हजार कोटी रुपये देऊ असे त्यांनी सांगितले. पण हे पैसे नेमके देणार कसे? कारण विम्यासाठीचे सर्व ट्रिगर काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता पीकविमा देणार तरी कसा? त्यामुळेच सरकारची ही पॅकेजची घोषणा फसवी आहे. या डबल इंजिन सरकारने, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने इतिहासातील सर्वात मोठी थाप मारली आहे, असेही ठाकरे म्हणाले. त्यामुळे सत्ताधारी ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.