अदानींच्या प्रकल्पात ठाकरे गटाचे कार्यकर्ते घुसले! बोअरवेल फोडली, जिल्हाप्रमुख पराग गुडधेंचा अधिकाऱ्यांना थेट धमकी

Adani Project Faces Protest in Melghat: मेळघाटातील अदानींच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला विरोध होत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोअरवेलची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे वातावरण तापलं आहे.

अदानींच्या प्रकल्पात ठाकरे गटाचे कार्यकर्ते घुसले! बोअरवेल फोडली, जिल्हाप्रमुख पराग गुडधेंचा अधिकाऱ्यांना थेट धमकी
Uddhav Thackeray's Party Workers Storm Proposed Adani Project Site
| Updated on: Nov 22, 2026 | 4:29 PM

मेळघाटच्या जंगलावर प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पामुळे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच आता या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला आक्रमक वळण मिळालं आहे. अदानी समूहाच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रकल्पस्थळी घुसून आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या बोअरवेलची तोडफोड करत ती बंद पाडली. त्यामुळे मेळघाटातील प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या आड नदी परिसरात अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड समूहाचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जंगलाच्या आत सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत माती परीक्षण सुरू असल्याची माहिती आहे. मात्र या प्रकल्पामुळे मेळघाटच्या जंगलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती पर्यावरणप्रेमी, स्थानिक आदिवासी आणि राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

Loading...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी प्रकल्पस्थळी जाऊन निषेध नोंदवला. यावेळी प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या बोअरवेलची तोडफोड करून ती बंद करण्यात आली. आंदोलनादरम्यान पराग गुडधे यांनी प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांना उद्देशून आक्रमक विधान केलं. ‘ज्या कुऱ्हाडीने यापुढे झाडे तोडाल, त्याच कुऱ्हाडीने या प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे हात छाटू,’ असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकल्पाला काँग्रेसकडूनही विरोध होत आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले आणि स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. वनविभागाची परवानगी नसतानाही परिसरातील अनेक झाडांची कत्तल झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. आंदोलकांच्या दाव्यानुसार, प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पामुळे सुमारे 250 हेक्टर जंगलक्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे.

दीड लाखांहून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालण्याची भीती आहे. त्यामुळे मेळघाटचं जैवविविधतेने समृद्ध जंगल धोक्यात येऊ शकतं, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक आदिवासी बांधवांनी झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केलं. झाडांची तोड थांबवून जंगल वाचवण्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

एकीकडे काँग्रेसचं चिपको आंदोलन, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका, यामुळे अदानी समूहाच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. मात्र, प्रकल्पामुळे नेमकं किती जंगलक्षेत्र बाधित होणार आणि पर्यावरणीय मंजुरीची सद्यस्थिती काय आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर येणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us