
“राजकारणात अनेकजण शिवसेनेत तयार झाले. पुढचं तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. तो काही आताच जन्माला आला नाही. तो चार पाच पिढ्यांचा आहे. ज्यांनी नावारुपाला आणला तो आजोबा आणि माझ्या वडिलांनी. त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला. त्यामुळे तुमचं आणि आमचं जुनं नातं आहे. पुण्याला वेगळी परंपरा आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. आता मुंबई काय आणि पुणे काय सर्व माहेर घरं बिल्डरांची झाली आहेत“ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी पत्रकारितेवर बोलू शकतो. मी सामनाचा संपादक आहेच. म्हणून थोडसं बोलू शकतो. आपल्याला अधिकार राहिला का की गमावला आहे. आपण टिळक आणि आगरकर यांचा उल्लेख करतो. पण त्यांच्याकडून काय घेतलं. सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का. हे विचारण्याची ताकद आहे का आपल्यात. अभूतपूर्व दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कात तळं झालं होतं. त्याही चिखलात शिवसैनिक होता. वयोवृद्ध आले होते. स्वतची चटणी भाकरी घेऊन आले होते. आपल्याकडे बिर्याणीची सोय नाही. पाऊस पडत असतानाही सर्व आले होते. तिथे काही दरवाजे नाही. त्यामुळे आलेल्यांना कोंडून ठेवण्याची गरज वाटली नाही. इतरांना वाटली असेल. भाषणं सुरू झाल्यावर दरवाजे बंद करतात“ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या आपण लायकीचे आहोत का?‘
“परंपरा म्हणून आम्ही शिवाजी पार्कातच सभा घेतली. त्या मेळाव्यात एक प्रयत्न होता, आहे आणि राहणार. पक्ष सत्तेत आला पाहिजे. सत्ता आल्यावर पुढे काय. सत्ता कशासाठी पाहिजे? सत्ता आल्यावर देश कधी सांभाळणार की नाही? राज्य कधी सांभाळणार नाही. आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्याची गरज आहे. आता एका पक्षाचे मंत्री बसले आहेत. आपण सोनम वांगचूकबद्दल बोलतो. किती लोकांना माहीत आहे. त्यांना रासूका खाली अटक करण्याची गरज काय? काय चुकीची होती. कालपर्यंत तुमची स्तुती केली म्हणजे देशप्रेमी होते. मग त्यांनी चूक केली तर मणिपूरमध्ये कुणाची चूक होती? आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरले. बातमी येत नाही. मणिपूरमध्ये काय चाललंय हे कुणालाच माहीत नाही. आपण बातमीच देत नाही. त्यामुळे टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या आपण लायकीचे आहोत का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकलं का?
“ढोंगाला लाथ मारणं हे आमचं काम आहे. आमच्या अंगावर हे लोकं येतात. तुम्ही हिंदुत्व सोडलं का म्हणता. मग तुम्ही काय काय सोडलं तुमची वंशावळ बघा. जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो. कडवट हिंदुत्ववादी होतो. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं का? माझा मोहन भागवतांवर आक्षेप नाही. संघाला १०० वर्ष पूर्ण झाली. संघाच्या पिढ्यांनी ज्या खस्ता घातल्या. त्या कष्टाला आज विषारी फळं लागली हे १०० वर्षाचं फलित आहे का? भागवत मशिदीत जातात. सौगात ए मोदी वाटत आहे. तुम्ही सौगात ए नेहरू, सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकलं का? सौगात ए मोदीवाले हिंदुत्ववादी कसे? पाकिस्तानसोबत संबंध ठेवू नका हे शिवसेनाप्रमुख म्हणायचे. तेच आम्ही सांगितलं. पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, असं तुम्ही सांगता, मग तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का?
“आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम सौगात ए मोदी वाटत आहेत, ३२ लाख लोकांना सौगात ए मोदी वाटतात. तरीही ते हिंदुत्ववादी. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद. असं कसं होऊ शकतं? भाजपने सौगात ए मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे” अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी केली.