शिवसेनेला नव्हे, भाजपला पुनर्बांधणीची गरज, उपऱ्यांनीच… उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

uddhav thackeray news : उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यावेळी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनेला नव्हे, भाजपला पुनर्बांधणीची गरज, उपऱ्यांनीच... उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
| Updated on: Jun 29, 2026 | 2:20 PM

उद्धव ठाकरेंना 4 वर्षांत दुसऱ्यांना पक्षफुटीचा फटका बसला. शिवसेनेचे 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदार फुटले. त्यानंतर यंदा ठाकरेंचे 6 खासदार फुटले. या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. आता उद्धव ठाकरे स्वत:च फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सत्ताधाऱ्यांवर घणाघात करताना दिसत आहेत. वारंवार होणाऱ्या पक्षफुटीमुळे शिवसेनेला पुनर्बांधणीची गरज असल्याचा सल्ला दिला जात होता. परंतु पुनर्बांधणीची गरज शिवसेनेला नसून भाजपला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवरच जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे आज सोमवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघातील जाहीर सभेतून ठाकरेंनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरही टीकेचे बाण सोडले. शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेला पुनर्बांधणीची गरज नाही. भाजपला गरज आहे. आम्ही २५ ते ३० वर्ष त्यांच्यासोबत होतो. देशाला मानतो तो मुस्लिम आपला आहे. हे आमचं हिंदुत्व भाजपला जोपर्यंत मान्य होतं, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो. आज भाजपमध्ये उपरे आहेत. त्यामुळे त्यांना पुनर्बांधणीची गरज आहे. यांना उपऱ्यांची गरज आहे. यांच्या पक्षाची बांधणी उपऱ्यांवर झाली. आज आमचा खासदार पळवला. उद्या दुसरा निवडून आणू. किती पळवून न्याल’.

ठाकरेंनी सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येण्याची शक्यता आहे. परंतु दिल्लीवाले त्यांचे पंख कापण्याचे काम करत आहे. पण फडणवीस म्हणतात, मला पंखच नाही. आता मग तुमचं काय कापू. पंख कापणे म्हणजे तुम्ही भरारी घेऊ नये. याआधी नितीन गडकरी यांच्या बाबतीत झालं होतं. नितीन गडकरी यांना संघाचा पाठिंबा होता. देवेंद्र फडणवीसांनाही संघाचा पाठिंबा आहे. त्यामुळे दिल्लीत जे चाललंय, ते मान्य आहे की नाही हे संघानं सांगावं’.

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘फोडाफोडीचं राजकारण केवळ शिवसेना फोडण्यापर्यंत नाही. हा योगायोग नाही. राज्यात शिवसेना फोडली. तृणमूल काँग्रेस फोडली. आम आदमी पक्ष फोडला. हे कारस्थान हुकूमशाहीसाठी चालू आहे. ते निवडणुकीत अब की बार 400 पार का करत होते? खरंतर त्यांना संविधान बदलायचं होतं’.

Follow Us