Abhijeet Dipke : अभिजीत दीपके मोदींना आव्हान देतोय आणि तुम्ही.. ? माजी मुख्यमंत्र्यांनी काढली नेत्यांची खरडपट्टी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षांतर्गत कलहामुळे त्रस्त झाले आहेत. नुकत्याच झालेल्या एका मीटिंगमध्ये त्यानी नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. अभिजीत दीपकेचं उदाहरण देऊन माजी मुख्यमंत्र्यांनी नेत्यांना सुनावलं.

कॉक्रोच जनता पार्टीचे अर्थात CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. जंतरमंतरवीरल तरूणाईच आंदोलन, शिक्षणमंत्र्याचा राजीनामा आणि सरकारला खडेबोल सुनावण्याची त्याची हातोटी यामुळे तरूणाईसह देशातील जनता त्याच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे. त्याच्या वक्तव्याची, करिश्म्याची भुरळ राजकीय पक्षांनाही न पडली तरच नवल. अभिजीत दीपके महाराष्ट्रातील त्याच्या मूळ गावी, आई-वडिलांना भेटायला आल्यानंतर, त्याची भेट घेण्यासाठी अनेक नेत्यांची रीघ लागली. सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षातील, अनेकांनी अभिजीत दीपके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला होता, तसेच भेटीच्या वेळेबाबातही विचारणा केली होती, अशी माहिती समोर आली होती.
आता ठाकरे गटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील वाढत्या गटबाजीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे-कल्याण विभागाच्या संघटनात्मक आढावा बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना खरमरीत शब्दांत सुनावत, सीजेपी (कॉकरोच जनता पार्टी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांचे उदाहरण देत मोठ्या राजकीय लढ्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
कल्याणमधील वादावरून वातावरण तापलं
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही अनुभवी कार्यकर्त्यांना पक्षातून वगळण्यात आल्याच्या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर असंतोष निर्माण झाला. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नव्या नेतृत्वामध्ये पदांवरून वर्चस्वाची चुरस निर्माण झाली असून, त्याचेच पडसाद संघटनात्मक बैठकीत उमटले. या बैठकीला आमदार मिलिंद नार्वेकर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि माजी आमदार विलास पोटनीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान सुरू असलेली शाब्दिक चकमक पाहून उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कठोर शब्दांत फटकारले. देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी पक्षातील नेत्यांनी छोट्या-छोट्या पदांसाठी संघर्ष करण्याऐवजी व्यापक राजकीय उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
दीपके यांचं दिलं उदाहरण
“देशातील परिस्थिती पाहा. अभिजीत दीपकेसारखा एक तरुण कार्यकर्ता आंदोलनाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतोय. आणि तुम्ही मात्र छोट्या पदांसाठी एकमेकांशी काय भांडताय ? ” असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं. त्यांच्या या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.
ठाण्यातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत
‘मातोश्री’ येथे झालेल्या या बैठकीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ठाणे जिल्ह्यातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. पक्षातील वाढती गटबाजी तळागाळातील संघटनात्मक कामकाजावर परिणाम करत असल्याची चर्चा असून, स्थानिक नाराजी रोखण्यासाठी नेतृत्वाकडून कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे-दीपके यांच्यात दूरध्वनीवर संवाद?
दरम्यान, काही वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांनी नुकताच अभिजीत दीपके यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून हा संपर्क झाल्याचे सांगितलं जातंय. या संभाषणात ठाकरे यांनी दीपके यांच्या आंदोलनाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली आणि त्यांना मुंबईतील ‘मातोश्री’ येथे भेटीसाठी निमंत्रित केल्याचीही माहिती समोर आली.