Explained : तुम्ही स्वत:च बोललात आदित्य ठाकरे म्हणून.. हेच कळलं असतं तर राणे, शिंदे सोडून गेले नसते

आज उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे. फुटीर खासदार, आमदारांवर प्रचंड तोंडसुख घेतलं जातय. त्यांना गद्दार, विश्वासघातकी ठरवलं जातय. पण ठाकरे गटाचं कुठे चुकतय, काय चुकतय याचं उत्तर कालच्या आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांच्या स्टेटमेंटमध्ये आहे.

Explained : तुम्ही स्वत:च बोललात आदित्य ठाकरे म्हणून.. हेच कळलं असतं तर राणे, शिंदे सोडून गेले नसते
Aaditya Thackeray-Uddhav Thackeray
Image Credit source: ANI
| Updated on: Jul 01, 2026 | 2:31 PM

मागच्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्राच राजकारण तापलं आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी घडतायत. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु आहे. विरोधी पक्ष शिल्लक राहणार की नाही? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कॅरमबोर्डवर स्ट्रायकरने डाव फोडल्यानंतर सोंगट्या जशा वेगळ्या होतात तसा उद्धव ठाकरे गट फुटत आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले सहा खासदार फुटले. चार वर्षांपूर्वी 2022 साली आमदार फुटले, त्यावेळी विचारधारेमुळे तिथे त्यांचं मन रमत नव्हतं हे समजू शकतो. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून नव्याने निवडून आलेले सहा खासदार फुटावेत. प्रत्येकाकडे आपपाली कारणं आहेत. कोणी विकासनिधीचं कारण दिलं, कोणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे भेटत नाहीत असं सांगितलं. खासदार फुटल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थतता असल्याची चर्चा होती. आता सचिन अहिर यांच्या रुपाने ती चर्चा खरी ठरली. खासदारांच्या पावलावर पाऊल टाकत सचिन अहिर यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.

ठाकरे गटातून कोणी लोकप्रतिनिधी फुटून बाहेर पडला की, लगेच त्याला गद्दार ठरवलं जातं. त्यांच्यावर व्यक्तिगत टिका केली जाते. आम्ही काय दिलं नाही? आमदारकी दिली, खासदार बनवलं असं लगेच बोललं जातं. तुम्ही जिंकलात ते माझ्या शिवसैनिकामुळे. तुम्ही कुठेही गेलात तरी तो शिवसैनिक तिथेच आहे, त्यामुळे आमच्या पक्षाला फरक पडत नाही. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे अशी नेहमीची शिवेसना स्टाइलची भाषणं ऐकू येतात. पण एक प्रश्न मनात निर्माण होतो, जो सोडून गेला त्याला तुम्ही आमदार-खासदार बनवलं मान्य. पण त्याला तुम्ही तिकीट का दिलं? त्याने शिवसेनेसाठी काहीच केलं नाही का? माजी आमदार दगडू सकपाळ, सदा सरवणकर, नारायण राणे, गणेश नाईक अशी बरीच नावं आहेत, ज्यांनी शिवसेना उभी करण्यासाठी बराच संघर्ष केला. त्यामुळे भले, ठाकरेंनी सोडून गेलेल्याला आमदार-खासदार बनवलं असेल, पण त्यांचा सुद्धा संघटनेसाठी त्याग तितकाच मोठा होता. म्हणून तुम्ही त्याला तिकीट दिलं ना?. शेवटी आजच्या राजकारणात उमेदवाराची आर्थिक बाजू सुद्धा तितकीच महत्वाची असते.

नारायण राणेंसारखी हिम्मत हवी

म्हणजे जे फुटले त्यांचं समर्थन अजिबात करणार नाही. कारण ते ज्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेत, ती त्या मतदारांशी फसवणूक आहे. वास्तविक त्यांनी ठाकरेंची विचारधारा पटत नाही ना, मग त्यांच्या पक्षाच्या आमदार-खासदारकीचा राजीनामा देऊन, ते ज्या पक्षात चाललेत त्यांच्या तिकीटावर पुन्हा निवडणूक लढवून निवडून यावं. नारायण राणे यांचं उदहारण समोर आहे. नारायण राणे 2005 साली शिवसेनेतून फुटून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला व काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूत लढवली होती.

दोन महत्वाची वक्तव्य

आजच्या लेखाचा विचार कालच्या आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांच्या वक्तव्यामध्ये दडलेला आहे. काल सचिन अहिर फुटल्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, “आम्ही सचिन अहिरला काय दिलं नाही, आमदारकी, प्रभाग समिती, बेस्ट कामागर सेनेच अध्यक्षपद इतकं सर्व दिलं तरी ते सोडून गेले” मूळात सचिन अहिर हे शिवसैनिक नव्हते. ते 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत आले होते. काल सुनील शिंदे यांनी बोलताना काही सूचक वक्तव्य केली. “आमच्या पण वरिष्ठांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे, कोणाला किती महत्व द्यायचं” त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की, मला पक्ष प्रमुखांबद्दल आदर आहे. त्याच्याबद्दल मी असं बोलणार नाही.

कोणाला किती महत्व द्यायचं हे कळलं पाहिजे

आता हे सचिन अहिर जे आहेत ते नेहमीच आदित्य ठाकरेंसोबत सावली सारखे दिसायचे. पाचवर्षांपूर्वी आलेला नेता मातोश्रीच्या खूप जवळ पोहोचला होता. त्याचवेळी सुनील शिंदे यांचा प्रवास शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार असा आहे. शिवसेनेची वरळीमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. त्यांचा तळागाळात जनसंपर्क आहे. अजूनही ते ठाकरेंसोबतच आहेत. यातून एकच गोष्ट दिसून येते, ती म्हणजे जे तुमच्यासोबत आहेत त्यांची कदर करण खूप आवश्यक आहे, कोणाला किती महत्व द्यायचं हे कळलं पाहिजे. सोडून गेलेल्यावर टीका करणं, त्याला स्वार्थी ठरवणं खूप सोपं असतं. पण आपल्याबाजूने आपण कुठे कमी पडतोय हे देखील तपासणं गरजेचं आहे.

Follow Us