या परत या, शिवसेना आपलीच, खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भर सभेत साद!

दोन तृतियांश बहुमतासाठी फोडाफोडी चालली आहे. महिला आरक्षण आणि संविधान बदलण्यासाठी त्यांचं हे चालू आहे. आपण त्यांना रोखलं होतं. त्यामुळे त्यांनी फोडाफोडी सुरू केली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

या परत या, शिवसेना आपलीच, खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भर सभेत साद!
uddhav thackeray speech
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 27, 2026 | 7:15 PM

Uddhav Thackeray : सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षात प्राण फुंकत आहेत. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्त्यांना पुन्हा लढण्यासाठी प्रेरित करत आहेत. ठाकरे यांनी हिंगोलीचा दौरा केला. आपल्या या दौऱ्यात त्यांनी भर सभेत जाहीर बंडखोर खासदारांवर सडकून टीका केली. तसेच गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या, पुन्हा लढा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी परत या अशी केलेली भानिक साद सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

दोन तृतियांश बहुमतासाठी फोडाफोडी चालली आहे. महिला आरक्षण आणि संविधान बदलण्यासाठी त्यांचं हे चालू आहे. आपण त्यांना रोखलं होतं. त्यामुळे त्यांनी फोडाफोडी सुरू केली आहे. डीलिमिटेशन झालं की तुमच्या, माझ्या मताला किंमत राहणार नाही. सर्व काही उत्तर भारताच्या हातात जाईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

मला शिवसेनेची सत्ता पाहिजे, मला न्याय द्यायचा आहे

ठाण्यात झालेल्या पेपरफुटीवरही त्यांनी यावेळी भाष्य केले. ठाण्यात टीईटीचा पेपर फुटला. नीटमध्ये पकडलेले आहेत. या पापाबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. त्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून फोडाफोडी चालली आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसेच मला शिवसेनेची सत्ता पाहिजे. मला न्याय द्यायचा आहे. मला शिवसेनेचा खासदार पाहिजे, असे म्हणत कार्यकर्त्यांनी पुन्हा लढा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

आज मी सर्वांना साद घालतो की…

पुढे बोलताना, मी हिंगोलीकरांना विनंती करतो, या नालायकामुळे नाराज होऊन घरी बसले असतील, जे कोणी नाराज होऊन दुसरीकडे गेले असतील त्या सगळ्यांनी परत यावे. परत या. यांच्याकडे सूत्रे दिली होती. यांनी वाटोळं करायचा जेवढा प्रयत्न करायचा तेवढा केला. स्वत:ही गेला, असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच जे कोणी नाराज होऊन गेले असतील या बाबांनो शिवसेना आपली आहे. आज मी सर्वांना साद घालतो. गद्दारांमुळे कोणी नाराज होऊन गेले असतील परत या. या गद्दाराला गाडा. तुम्ही निष्ठावंत आहात, अशी थेट सादही त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना घातली.

Follow Us