मुंडेंच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, सरकारला थेट सवाल, म्हणाले…

आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे, यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंडेंच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, सरकारला थेट सवाल, म्हणाले...
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 04, 2025 | 6:52 PM

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले आहेत.  यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट असून वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सीआयडीनं दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये या प्रकरणाचा मास्टर मांईड हा वाल्मिक कराडच असल्याचं म्हटलं आहे. संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केल्यानं त्यांची हत्या करण्यात आली, असा सीआडीनं आपल्या आरोप पत्रामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर राजीनामा देण्याबाबत धनंजय मुंडेंवर दबाव वाढला होता. त्यातच आता संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले.  अखेर आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

जे काही बोलायचं होतं ते माझ्या आमदारांनी म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोलून झालं आहे. प्रश्न हा सर्वांना पडला आहे तो म्हणजे जे काही फोटो आणि व्हिडीओ काल आले ते सरकारकडे आधी आले होते की नाही? आजचा हा पहिला दिवस झाला आहे राजीनाम्याचा आणि एकूणच चर्चेचा. हळूहळू आणखी काही विषय समोर येतील, रोजच पाहिलं तर काहीना काही तरी भानगडी बाहेर येत आहेत. मला वाटतं जर मुख्यमंत्री पारदर्शकपणे काम करत असतील तर त्यांचं स्वागत आहे, पण पारदर्शक कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधत आहे का? हा सुद्धा एक प्रश्न आहे, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या जनतेला आता या सर्व गोष्टींचा कंटाळाला आला आहे, विट आला आहे. आता जनतेला त्यांच्या समस्या सोडवणारं सरकार पाहिजे, एकमेकांच्या चुकांवर पांघरून घालणारं सरकार नको. आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून नेमके कोणाच्या विरोधात आहोत तर या समस्यांच्या विरोधात आहोत.  त्यामुळे प्रत्येकानं आपआपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.