
Vitthal Rukmini Temple: तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे दर्शनासाठी टोकन प्रणालीचा वापर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात करण्यात येणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच टोकन दर्शन प्रणालीचा वापर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल, रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शन प्रणालीची चाचणी आजपासून सुरु करण्यात आली. या टोकन दर्शन प्रणालीचे संगणकीय काम टीसीएस ही कंपनी करणार आहे. टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसभरातून बाराशे भाविकांची दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना घरी बसून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून दर्शनाचा स्लॉट बुक करता येणार आहे.
तिरुपती बाजाली मंदिरात भाविकांना दर्शनासाठी टोकन दिले जातात. त्याच पद्धतीचा वापर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात येणार आहे. टोकन घेतल्यावर दर्शन मंडपात दुसऱ्या मजल्यावर भाविकांची बसण्याची व्यवस्था केली आहे. ज्या ठिकाणी भाविकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली त्या ठिकाणी सर्वच सोय उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बैठक व्यवस्थितेत भाविकांना बसण्यासाठी त्याचबरोबर शौचालय, स्नान गृह, भाविकांना चहा, नाष्टा तसेच विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन देखील पाहता येणार आहे.
भविकांचा दर्शनाचा पहिला स्लॉट सकाळी 9 ते 10 या वेळेत ठेवला आहे. या स्लॉटमधील 200 भाविकांना टोकन दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. दिवसभरातून टोकन दर्शनाचे सहा स्लॉट करण्यात आलेले आहेत. आषाढी यात्रेत गर्दीचे महत्त्वाचे तीन दिवस वगळून इतर वेळेला भाविकांना या टोकन दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.