“संजय राऊत तेव्हा तुम्ही गोधडी…”, राणेंची पुन्हा जीभ घसरली

लोकसभेत सादर झालेल्या वक्फ संशोधन विधेयकावर जोरदार वाद झाला. भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत. नितेश राणे यांनी शिवसेना (ठाकरे गट) वर वक्फ बोर्डला पाठिंबा देण्यासाठी टीका केली. या विधेयकावरून शिवसेना (शिंदे गट), तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संजय राऊत तेव्हा तुम्ही गोधडी..., राणेंची पुन्हा जीभ घसरली
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2025 | 7:04 PM

आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होत असताना मोठा गोंधळ झाला. यावेळी भाजप, शिवसेना शिंदे गट, तृणमूल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आता यावर भाजप नेते आणि मत्स्य-बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी हिरवीसेना, असे नितेश राणे यांनी म्हटले.

नितेश राणे यांनी नुकतंच एक प्रतिक्रिया दिली. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी वक्फ बोर्डाबद्दल भाष्य केले आहे. भाजपला “मिशा फुटल्या नव्हत्या” म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही “गोधडी ओली करत होतात” तेव्हा भाजप आणि देवेंद्रजी राम मंदिरासाठी कारसेवा करत होते, असे नितेश राणे म्हणाले.

नितेश राणेंचे ट्वीट

“देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपला हिंदुत्व शिकवायची संजय राजाराम राऊत यांची लायकी नाही. ज्यांनी 370 हटवलं, राम मंदिर उभारलं, समान नागरिक कायद्याकडे पाऊल टाकलं, त्या पक्षाला तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार? थोडीशी लाज असेल तर राऊतांनी औरंगझेब फॅन क्लबचे म्होरक्या आणि आपला मालक उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या दोन गोष्टी सांगाव्यात. भाजपला “मिशा फुटल्या नव्हत्या” म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही “गोधडी ओली करत होतात” तेव्हा भाजप आणि देवेंद्रजी राम मंदिरासाठी कारसेवा करत होते.

आजचा उबाठा गट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणारी आणि वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी हिरवीसेना झाली आहे. ठाकरे गटानं हिंदुत्वाचा “पीळ” सोडून दिला आहे, आणि आता काँग्रेसच्या अजेंड्यावर हिंदुत्वाशी लबाडी करत आहे. राम आणि कृष्ण आले आणि गेले असं संजय राजाराम राऊत म्हणाले पण आजही हिंदू प्रभू राम आणि श्रीकृष्णांवर श्रद्धा ठेवून आहे. तुम्ही जनाबी परंपरा पाळायला सुरूवात केल्यामुळे राम आणि कृष्ण तुम्हाला कळणार नाहीत. महाराष्ट्रातील जनता सगळी सत्य परिस्थिती पाहत आहे. संजय राऊत कितीही वटवट केली तरी लोकांना आता मूर्ख बनवता येणार नाही!”, असे नितेश राणे यांनी म्हटले.

किरेन रिजिजू काय म्हणाले?

दरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ सुधारणा विधेयक 2025 वर सरकारचे विचार मांडताना सांगितले की आपण जेपीसीच्या सर्व सदस्यांचे आभार मानत आहोत. 284 प्रतिनिधीमंडळांनी आपल्या शिफारसी जेपीसीला दिल्या होत्या. 25 राज्यांच्या वक्फ बोर्डांनी आपआपली बाजू मांडली आहे. केंद्रीय मंत्र्याने सांगितले की स्वतंत्र भारताचे वक्फ अधिनियम प्रथम 1954 रोजी स्थापन झाले होते, त्याच अधिनियमात राज्यांच्या वक्फ बोर्डांसाठी तरतूद केली होती. 1995 मध्ये विस्तृत वक्फ अधिनियम आणला होता. त्यावेळी कोणी बोलले नाही की हे विधेयक घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे. आज आम्ही त्याचे विधेयकात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर तुम्हाला घटनाबाह्य आणि बेकायदेशीर वाटत आहे. विरोधी पक्ष लोकांची दीशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.