Wardha Flood : वर्ध्यातील वणा नदीच्या पुरात दुचाकी चालविण्याचे धाडस, पुलावर अडकला युवक, नागरिकांच्या मदतीने सुखरूप काढले बाहेर

पुलावरून पाणी असतानासुद्धा युवकाने केलेला हा धाडस त्याच्या जीवावर बेतणारा ठरत होता. मात्र वेळीच नागरिकांनी मदत केल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Wardha Flood : वर्ध्यातील वणा नदीच्या पुरात दुचाकी चालविण्याचे धाडस, पुलावर अडकला युवक, नागरिकांच्या मदतीने सुखरूप काढले बाहेर
वर्ध्यातील वणा नदीच्या पुरात दुचाकी चालविण्याचे धाडस, पुलावर अडकला युवक
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 15, 2022 | 3:19 PM

वर्धा : संपूर्ण जिल्ह्यात पावसाच्या संततधारमुळे नदी नाल्याना पूर आलेला आहे. एकीकडे पावसाच्या पावसाचे थैमान तर दुसरीकडे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्याच्या बोरगाव कुटकी (Borgaon Kutki) येथे वणा नदीच्या पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे. या पाण्याच्या प्रवाहातून कुटकी येथील एक युवक दुचाकीने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पुलाच्या मध्येच त्याचे वाहन अडकले. युवक अडकल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढले. कुटकी येथील सचिन सहारे (Sachin Sahare) हा युवक या पुलावरून पाण्याच्या प्रवाहात आपली दुचाकी काढत होता. दरम्यान, त्याची दुचाकी पुलाच्या मधोमध अडकली. युवक पाण्यात अडकताच स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य होत नव्हते. युवक पुलावर अडकल्याचे लक्षात येताच बोरगाव नांदगाव येथील नागरिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढले.

जीवावर बेतणारा अतिधाडस

या युवकाला गावातील विश्वास सुसाटे, मधुकर बावणे, अरविंद कातरे आणी पोलीस कर्मचारी मिलिंद वादाफळे, पवन बावणे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर काढले. पुलावरून पाणी असतानासुद्धा युवकाने केलेला हा धाडस त्याच्या जीवावर बेतणारा ठरत होता. मात्र वेळीच नागरिकांनी मदत केल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. प्रशासनाकडून वारंवार सूचना करूनही अश्या प्रकारचे धाडस करणे हे जीवावर बेतणारे ठरू सकते. त्यामुळे नागरिकांनी पूरपरिस्थिती असलेल्या भागात काळजी घेणे गरजेचे आहे.

निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याच्या विसर्गात वाढ

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील धानोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पातून सोमवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू होता. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि अप्पर वर्धा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने विसर्गात वाढ करण्यात आलीय. हा प्रकल्प 55.75 टक्के भरला असून प्रकल्पाचे 17 दरवाजे 90 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. सध्या प्रकल्पातून 1253.16 क्युमेकचा विसर्ग सुरु आहे. धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्याच्या अप्पर वर्धा प्रकल्पातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पावसामुळं पाण्याची आवक वाढल्याने पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.

कारंजा तालुक्याच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

पावसाच्या संततधारमुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. अश्यातच जिल्ह्याच्या प्रकल्पाच्या पाणी साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कारंजा तालुक्याच्या नागरिकांची तहान भागाविणारा कार नदी प्रकल्प (खैरी धरण )हा शंभर टक्के भरला आहे. 45 सेंटीमीटरने पाणी सांडव्यावरून ओव्हरफ्लो होत आहे. कारंजा तालुक्यातील जवळपास 25 गावांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास सात हजार हेक्टरवरील शेतीला सिंचनासाठी पाणी दिल्या जाते. धरण ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांच्या पाण्याची समस्या मिटली आहे.