ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ भागात 2 दिवस पाणी पुरवठा बंद

ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यात सलग 2 दिवस 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच अंधेरीतही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, या भागात 2 दिवस पाणी पुरवठा बंद
Water Cut in Thane
| Updated on: Jun 17, 2025 | 7:57 PM

ठाण्यासह राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. मात्र ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यात सलग 2 दिवस 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ठाण्यात कोणते 2 दिवस आणि कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद राहणार याबाब सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दोन दिवस पाणी पुरवठा बंद

ठाणे महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 18 जून आणि गुरूवार 19 जून रोजी ठाण्याच्या काही भागात 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा होतो, मात्र काही अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवारी सकाळी 9 वाजेपासून ते गुरूवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार असल्याने ठाणे पालिकेने पाणी पुरवठ्याचे नियाजन केले आहे. त्यानुसार 18 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाउंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली, ओवळा या भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे.

तसेच 18 जून रात्री 9 ते 19 जून रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत समता नगर, ऋतु पार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्राच्या काही भागातील पाणी पुरवठा 12 तासांसाठी बंद राहणार आहे. यानंतर एक-दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती ठाणे पालिका प्रशासनाने दिली आहे. या काळात नागरिकांनी जास्तीचा पाणी साठा करुन ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही पालिकेने केले आहे.

गुरुवारी अंधेरीतही पाणी पुरवठा बंद

गुरुवारी अंधेरीतील काही भागात पाणीपुरवठा बंद असणार आहेत. ११अंधेरी पश्चिम येथील वांद्रे जलवाहिनीवरील फ्लो कंट्रोल वॉल्व्ह दुरूस्त करण्यासाठी आणि वेसावे जलवाहिनीवरील बटरफ्लाय वॉल्व्ह बदलण्याची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार 19 जून दुपारी 2 पासून शुक्रवारी 20 जून रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत असा 11 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

गुरुवारी पार्ले पश्चिमेकडील लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, पार्ले गावठाण, मीलन भूयारी मार्ग, जुहू विलेपार्ले विकास योजना, जुहू गावठाण क्रमांक 3, व्ही. एम. मार्ग, मोरागाव, जुहू गावठाण क्रमांक 1 आणि 2, जुहू गल्ली, धनगरवाडी, सागर सिटी सोसायटी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.