राज ठाकरेंबाबत काय म्हणाले? नरेंद्र जाधवांची पहिली प्रतिक्रिया; त्रिभाषा समितीचे अध्यक्ष होताच…

हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्यानंतर सरकारने दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आता पहिल्यांदाच नरेंद्र जाधव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज ठाकरेंबाबत काय म्हणाले? नरेंद्र जाधवांची पहिली प्रतिक्रिया; त्रिभाषा समितीचे अध्यक्ष होताच...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2025 | 6:59 PM

हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं होतं. पहिली पासून हिंदीची सक्ती नको अशी राज्यातील अनेक संघटना आणि पक्षांची भूमिका होती.  या पार्श्वभूमीवर येत्या 5 जुलै रोजी भव्य असा मोर्चा निघणार होता, त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू  मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार होते. मात्र त्याचपूर्वी सरकारने मोठा निर्णय घेतला, सरकारकडून त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले आहेत. तर त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच आता त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान सरकारने हे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर पाच जुलैचा मोर्चा देखील रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी आता विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही उपस्थित असणार आहे. दरम्यान समिती स्थापन केल्यानंतर आता नरेंद्र जाधव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हटलं जाधव यांनी? 

अध्यक्षाच्या नावाची घोषणा झालेली आहे, समितीत अनेक लोक असणार आहेत. तीन महिने हातात आहेत. माशेलकर समितीचा अभ्यास करणार आहोत. माशेलकर समितीच्या अहवालाचा अभ्यास करणार आहोत. विरोध करणाऱ्या नेत्यांची बाजू समजून घेवून, अहवाल तयार करणार आहोत. अजून खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली नाही.  मराठीला प्राधान्य असायला हवे, असं जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या नरेंद्र जाधव हे भाजपच्या जवळचे आहेत, अशी देखील चर्चा सुरू आहे. यावर देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. मी कुठल्याही पक्षाचा सद्स्य नाही आहे, राष्ट्रपती सदस्य म्हणून माझी निवड़ करण्यात आली.  राजकीय अनुभव नाही अश्या 12 व्यक्तीची निवड केली जाते, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षात तो व्यक्ती नसतो. मी भाजपासोबत त्यावेळी बसलो नव्हतो. मी स्वतंत्र्य बाणा ठेवला होता. फडणवीसांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं, असं जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की, मी राज ठाकरे यांचं म्हणणं ऐकूण घेणार आहे. त्रिभाषा सूत्रावर अभ्यास करत असताना, नेत्यांचं, तज्ज्ञांचं आणि पालकांचं मत विचारत घेतलं जाईल, आम्ही वेळेत अहवाल सादर करू असं जाधव यांनी म्हटलं आहे.