
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरु आहे. मात्र, शनिवारी भाजप नेते नारायण राणे यांनी या मतदारसंघातून आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सिंधुदुर्गातील 4 मतदारसंघात लीड मिळाल्यास माझा विजय निश्चित होईल, असं विधान नारायण राणेंनी केलंय. दरम्यान, दोन दिवसात रत्नागिरी-सिंधुदुर्गसंदर्भात निर्णय होणार असल्याचंही नारायण राणेंनी स्पष्ट केलंय. पक्षानं दिलेली जबाबदारी चोख पद्धतीनं पार पाडणार असल्याचंही राणेंनी यावेळी म्हटलंय. रत्नागिरी-सिंधुदुर्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत यांनीही दावा सांगितलाय. मात्र, दुसरीकडे नारायण राणेही या मतदारसंघावर भाजपचाच दावा असल्याचं म्हणत आहेत. रत्नागिरी मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरोधात भाजपकडून नारायण राणेंचं नाव आघाडीवर आहे. मात्र, महायुतीकडून कोणकोण मैदानात उतरू शकतं? त्यावर एक नजर टाकुयात
ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर रत्नागिरीसाठी भाजपकडून नारायण राणेंचं नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर निलेश राणेंचं नाव चर्चेत आहे. भाजपचे रविंद्र चव्हाणही इच्छूक आहेत. शिंदे गटातून उदय सामंतांचे बंधू किरण सामंतही आग्रही आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी हे ६ मतदारसंघ आहेत. राजापूर आणि कुडाळ मतदारसंघात ठाकरेंचे आमदार, रत्नागिरी आणि सावंतवाडीत शिंदेंचे आमदार आणि कणकवलीत भाजपचा, तर चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत.
2019च्या लोकसभेत विनायक राऊतांनी अपक्ष लढणाऱ्या निलेश राणेंचा पराभव केला होता. 2019 रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत विनायक राऊतांना निलेश राणेंनी आव्हान दिलं होतं. विनायक राऊतांना 4,58,022 तर निलेश राणेंना 2,79,700 मतं पडली. राऊतांनी 1 लाख 78 हजार 322 मतांनी राणेंचा पराभव केला होता.
एकिकडे महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत वाद सुरूय. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. यावरूनच आदित्य ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंवर टीकास्त्र डागलं होतं. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या टीकेला श्रीकांत शिंदेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कल्याण-डोंबिवलीमध्ये स्थानिक भाजप, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंना विरोध केला होता. मात्र, त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचं मत जाणून घेतलं.
एकीकडे कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांना विरोध केला. मात्र, त्यानंतर काही तासातच देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी घोषित केली. 2019 चे कल्याण डोंबिवलीमधील आकडे बघितले तर श्रीकांत शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचं आव्हान होतं. या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंना 5,59,723 मतं
तर बाबाजी पाटलांना 2,15,380 मतं मिळाही होती. 3,44,000 मतांच्या अंतरानं श्रीकांत शिंदेंनी विजय संपादन केला होता.
महायुतीत एकिकडे रत्नागिरी-सिंधुदुर्गवरून तिढा सुरुय. तर दुसरीकडे ठाण्याच्या जागेवर अद्यापही उमेदवार जाहीर न केल्यामुळे विरोधकांनी शिंदेंना डिवचलंय. त्यामुळे महायुतीचा जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.