शिवसेना कोणाची? सिब्बल यांनी दिले दोन दाखले; शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदे यांना जबर धक्का?
शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणचं यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, यावळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टात दोन खटल्यांचे दाखले देखील दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं होतं. शिवसेनेमध्ये दोन गट पडले, एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट दरम्यान तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर देखील दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव हे शिवसेना शिंदे गटाला देण्यात आलं.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात दोन दाखले देखील दिले.
नेमकं काय म्हणाले कपिल सिब्बल?
परिच्छेद ३ आणि ४ या दोन्हींचा संपूर्ण उद्देश हा बचावाचा (defence) आहे. जर माझ्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू केली, तर माझा बचाव असा असू शकतो की मी एक-तृतीयांश (1/3) आहे. परिच्छेद ४ अंतर्गत माझा बचाव असा असू शकतो की माझे दुसऱ्या पक्षात विलिनीकरण (merger) झाले आहे. मात्र, तुम्ही या तरतुदींचा असा अर्थ लावू शकत नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील (Representation of the People Act) कलम २९-अ अंतर्गत विधिमंडळ पक्ष (legislature party) ही संकल्पनाच मान्य केलेली नाही. निवडणूक चिन्ह आदेशातही विधिमंडळ पक्षाची संकल्पना मान्य केलेली नाही. संस्थात्मक अखंडता (institutional integrity) ही लोकशाहीच्या केंद्रस्थानी आहे. पक्षांतर (defection) हे संविधानिक पाप आहे. आता मात्र ते अभिमानाचे चिन्ह (badge of honor) बनले आहे, असा युक्तिवाद यावेळी सिब्बल यांनी केला आहे. दरम्यान आता या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.