उद्धव ठाकरेंनी एवढ सांगूनही चंद्रपूरचे नगरसेवक भाजपसोबत का गेले? खरं कारण आलं समोर

संजय राऊत म्हणाले की, "27 नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे"

उद्धव ठाकरेंनी एवढ सांगूनही चंद्रपूरचे नगरसेवक भाजपसोबत का गेले? खरं कारण आलं समोर
Uddhav Thackeray
| Updated on: Feb 11, 2026 | 1:01 PM

चंद्रपूर महानगरपालिकेत काल महापौरपदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाली. खरंतर काँग्रेसकडे संख्याबळ जास्त होतं. त्यांचा महापौर निवडून यायला पाहिजे होता. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस सोबत आहेत. मात्र, एवढं सगळं असूनही चंद्रपूरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. हे खरच आश्चर्यकारक आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही असं म्हटलं होतं. तरी चंद्रपूरमधील उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी ऐनवेळी भाजपला साथ दिली. असं का? पडद्यामागे काय घडलं? जाणून घ्या.

काँग्रेसकडून ठाकरे गटाच्या भूमिकेवर टीका करण्यात आली. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “27 नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे” आता चंद्रपूरमधील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तो आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सोबतच राहण्याचे निर्देश होते. त्यानुसारच आम्ही काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी जिथे जिथे म्हटलं तिथे तिथे चर्चेसाठी गेलो. काल पण शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस सोबतच आम्ही चर्चा करत होतो. पण आम्हाला शिवसेनेची गरज नाही असं त्यांचं मत होतं” असं संदीप गिर्हे म्हणाले. “त्यामुळे आमचा वारंवार अपमान केला जात होता. तो आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवला. संजय राऊत यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. मात्र इतर नेत्यांच्या माध्यमातून स्थानिक परिस्थिती ही उद्धवजींपर्यंत पोहोचवण्यात आली होती” असं संदीप गिर्हेंनी सांगितलं.

उद्धवजी आमच्या या भावना समजून घेतील

“त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही हा काल निर्णय घेतला. शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ते टिकले पाहिजे हीच भावना होती. मला विश्वास आहे की उद्धवजी आमच्या या भावना समजून घेतील. स्थायी समितीचे अध्यक्ष पद आम्हाला मिळणार आहे. ती निवडणूक झाली की आम्ही उद्धवजींना भेटणार आहोत” असं संदीप गिर्हे म्हणाले.