NCP Leaders Meet Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते पार्थ पवार, सुनेत्रा पवारांशिवाय अमित शाहंना का भेटले? कारण आलं समोर

NCP Leaders Meet Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काल रात्री अचानक अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो समोर आलेत. त्यात पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार दिसत नाहीयत. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

NCP Leaders Meet Amit Shah :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते पार्थ पवार, सुनेत्रा पवारांशिवाय अमित शाहंना का भेटले? कारण आलं समोर
NCP Leaders Meet Amit Shah
| Updated on: Nov 02, 2026 | 11:57 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कारण या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार नाहीयत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत काही नाराजी आहे का? राष्ट्रवादीमध्ये काय घडणार? सर्व काही आलबेल नाहीय का? अशा उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या फोटोमध्ये दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर पकडला आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेसलाही फटका बसला. पाच पैकी राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती संभाजीनगरमधील विधान परिषदेची एक जागा लढवत होती. त्यात पदवीधरमध्ये सतीश चव्हाण यांचा पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत कुरबुरी वाढल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांच्या नेतृत्व गुणांची सुद्धा चर्चा सुरु असते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील हे बडे नेते एकाचवेळी अमित शाह यांना भेटले. त्या मागचं कारण आता समोर आलं आहे.

Loading...

राष्ट्रवादीचे नेते अमित शाहंना का भेटले?

राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं पुन्हा मिळावं म्हणून ही भेट झाल्याची चर्चा आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात अजित पवार यांचं अपघाती निधन झालं, तेव्हापासून अर्थ खातं हे भाजपकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थ खातं संभाळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला हे खातं परत हवय. पण भाजपने अजून हे खातं सोडलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रात आणि राज्यात महायुतीचा भाग आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. पण अर्थखातं त्यांना दिलं नाही. त्याशिवाय मध्यंतरी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे पक्षांतर्गत मतभेद झाल्याचं समोर आलेलं. त्यावेळी सुनील तटकरेंनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us