Maharashtra Rain Report: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला पण..रिपोर्टमधील आकडे पाहा, येणाऱ्या दिवसातील भयाण वास्तवाची होईल जाणीव
Maharashtra October Rain Report: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी फक्त पाऊस पडला पण पूर्ण महिना तसाच निघून गेला. या मुळे आता या पूर्ण महिन्यात एकूण किती तूट झाली आहे ते रिपोर्टमध्ये पाहा...

October Rain Report: ऑक्टोबरचा शेवट आणि नोव्हेंबरची सुरुवात पावसाने झाली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. पावसाच्या अचानक एन्ट्रीने सगळेच सुखावले. पुणे, अहिल्यानगर आणि सातारामध्ये पावसाचीने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे रस्तेही जलमय झाले होते, अनेक ठिकाणी पाणी साचलं इतका पाऊस पडला. या अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक सेवाही विस्कळीत झाली होती, एकंदरीतच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडालेली. पण उकाड्यामुळे हैरान झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. पण असे असूनही काही ठिकाणी पाऊस न पडल्याने पाण्याची कमतरतेची चिंता कायम आहे.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ९५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरमध्ये राज्यात सरासरी ७४ मिमी पाऊस अपेक्षित होता पण; प्रत्यक्षात केवळ ३.६ मिमी पाऊसच पडला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. मुंबई शहर, धुळे, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांत शून्य पावसाची नोंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या १२ जिल्ह्यांमध्ये पावसाची १०० टक्के तूट नोंदवली गेली आहे. या मुंबई शहरात सरासरी ७३.५ मिमी पाऊस अपेक्षित होता पण प्रत्यक्षात शून्य टक्के पाऊस पडला आहे. मुंबई उपनगरात सरासरी ८१.२ मिमीच्या तुलनेत १४.६ मिमी पाऊस; ८२ टक्के तूट दिसत आहे. मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात एकही मिलीमीटर पाऊस नसल्याचे समोर येत आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी ७७.९ मिमीच्या तुलनेत केवळ ४.१ मिमी पाऊस; ९५ टक्के तूट आहे. विदर्भात सरासरी ५७.८ मिमीऐवजी केवळ २.२ मिमी पाऊस; ९६ टक्के तूट असल्याचे दिसत आहे. कोकण-गोवा विभागात सरासरी ११६.४ मिमीच्या तुलनेत १९.१ मिमी पाऊस पडला आहे; तर ८४ टक्के तूट असल्याचे दिसत आहे. पालघर आणि रायगडमध्ये ९६ टक्के, तर ठाण्यात ८४ टक्के पावसाची तूट आहे.
