
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. आज महायुतीकडून शिवाजी पार्कवर महाययुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य केले आहे. तसेच राज ठाकरेंवरही हल्ला केला आहे. एकनाथ शिंदे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
ठाकरे बंधुंच्या युतीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज जे लोक मराठी माणसाच्या नावाने गळे काढत आहेत. ते निवडणूक संपल्यावर आराम करायला कुठे जातात तुम्हाला माहीत आहे. यांना मुंबईशी काही घेणंदेणं नाही. मराठी माणसाशी घेणंदेणं नाही. वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणतात. मग 20 वर्षापूर्वी एक का झाला नाही? तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही. तेव्हा तुमचा अहंकार मोठा होता.’
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘कालपरवा पर्यंत एकमेकांवर काय बोलला ते आठवा. स्वार्थासाठी वेगळे झाला. स्वार्थासाठीच एकत्र आला. मराठी माणसाच्या नावाने खोटं प्रेम दाखवत आहेत. हे पुतणा मावशीचं प्रेम आहे. आम्ही साडेतीन वर्षात काय केलं ते पाहा. 20 वर्षात आम्ही विचारांची भूमिका घेतली. तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करता असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ठाकरे बंधुंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ही लोकं विकास विरोधी आहेत. मुंबईतील पुनर्विकासाच्या कामामुळे यांना खोकला होतो म्हणे. पण वर्षानुवर्ष झोपड्यात राहणारे आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांपेक्षा यांना खोकल्याचं कौतुक. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधता आणि गोरगरीबांनी गटाराच्या बाजूला राहायचं. लोकांच्या वेदना जाणून घ्यायला कुणाचा जन्म कुठे झाला हे महत्त्वाचं नाही. सामान्य लोकांसाठी कोण पोटतिडकीने काम करतो हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वेदना कळणार’ असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.