
महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केंद्रीय-राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मतदार यादीतील त्रुटी दाखवून दिल्या. राज ठाकरे यांनी मतदार यादीतील त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका अजून सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केली. “आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. ही भाजपच्या विरोधातील मोहीम नाही. भाजपच्या प्रवक्त्यांनी उत्तरे देऊ नये“ असं शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले.
“निवडणूक यादीत घोळ आहे. यादीतील घोळ राज्य आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीसमोर ठेवले. ते सुधारावेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांचे समाधान झाले पाहिजे. जे निवडणूक लढवतात त्यांचं समाधान झालं पाहिजे. ही रास्त मागणी आहे. यात गोंधळ आणि संभ्रम असण्याचं काम नाही. क्लिष्ट काहीच नाही. याद्यातील घोळ समोर ठेवल्यावर त्यांनी आणि राजकीय पक्षांनी याद्या सुधारल्या पाहिजे. सुधारूनच पुढे गेलं पाहिजे“ असं राज ठाकरे म्हणाले.
‘ही कोणती लोकशाही आहे?‘
“2024 विधानसभा निवडणूक झाली. 232 जागा महायुतीच्या आल्या. संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या जागा आल्यावरही सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष पाहिजे तो झालाच नाही. निवडून आलेल्यांनाही धक्का बसावा एवढा हा सन्नाटा होता. ही कोणती लोकशाही आहे?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
‘महाविकास आघाडीसोबत जाणार का?‘
“मी 2019 साली सोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार हे महत्वाचं आहे. कुणाबरोबर होणार हा आताचा विषय नाही. 2019 लाही मी तेच बोलत होतो. अजित पवारही त्यावेळी सोबत होते. त्यांनी यायला हवं होतं. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते. सांगत होते सर्व गोष्टी“ असं राज ठाकरे म्हणाले.