AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाई माझ्या म्हशीचा अख्ख्या जगाला लागलाय लळा... साताऱ्याच्या राधा म्हशीची गिनीज बुकात नोंद; असं काय घडलं?

बाई माझ्या म्हशीचा अख्ख्या जगाला लागलाय लळा… साताऱ्याच्या राधा म्हशीची गिनीज बुकात नोंद; असं काय घडलं?

| Updated on: Nov 12, 2025 | 1:57 PM
Share

सातारा जिल्ह्यातील मलवडीच्या 'राधा' म्हशीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 'जगातील सर्वात लहान म्हैस' म्हणून नोंद केली आहे. अडीच वर्षांची असून तिची उंची केवळ 83.8 सेमी आहे. मालक अनिकेत बोराटे यांच्या प्रयत्नाने राधाने अनेक कृषी प्रदर्शने गाजवून आता जगभरात कौतुक मिळवले आहे. ही बुटकी राधा आता जगाचे आकर्षण बनली आहे.

भारतातील अनेक गोष्टींचा जगाला हेवा वाटत असतो. येथील लेण्या, किल्ल्या, सरोवरांपासून ते जंगल, डोंगराळ रांगाही जगाच्या आकर्षणाचं केंद्र आहे. भारतात असंख्य अशा अद्भूत गोष्टी आहेत. त्यामुळे जगातील पर्यटक भारताकडे आकर्षित होतात. त्यात आता एका म्हशीची भर पडली आहे. या म्हशीची जगाने दखल घेतलीय. साताऱ्याच्या या म्हशीची थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे ही म्हैस पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक येत आहेत. या म्हशीचं कौतुक करत आहेत. लैय भारी… अशी प्रतिक्रियाही देत आहे. कौतुक करावं असं काय आहे या म्हशीत?

या म्हशीचं नाव राधा आहे. ही म्हैस जगातील सर्वात लहान म्हैस आहे. त्यामुळे तिला बुटकी राधा म्हणूनही साताऱ्यात ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडीची ही बुटकी राधा म्हैस आहे. तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीय. या ठेंगण्या ‘राधा’ला पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून प्रत्येक प्रदर्शनात ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मलवडीतील शेतकरी आणि पशुपालक त्रिंबक बोराटे आणि त्यांचा मुलगा अनिकेत बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीने 19 जून 2022 रोजी ‘राधा’ला जन्म दिला. पण तिची उंचीच वाढत नसल्याने सर्वांच्या आकर्षणाची ती केंद्र झाली आहे.

अडीच वर्षाची झाली अन्…

‘राधा’ दोन-अडीच वर्षाची झाल्यावर तिच्या उंचीतला बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने ‘राधा’ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. 21 डिसेंबर 2024 सोलापूर येथील सिध्देश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा ‘राधा’ने सहभाग घेतला. अन् ‘राधा’चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन आणि कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण 13 कृषी प्रदर्शनात भाग घेतला. या प्रदर्शनांमध्ये खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आलं होतं.

अन् गिनीज बुकात गेली…

24 जानेवारी 2025 रोजी ‘राधा’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने ‘राधा’च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. 12 सप्टेंबर 2025 ला ‘राधा’ची पाहणी करुन अहवाल पाठवला. 20 सप्टेंबरला कागदपत्रे सादर केली. आणि ‘राधा’ची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. यामुळे यानंतर राधाचे म्हशीचे मालक यांच्यावर कौतुकांचा वर्ष होताना पाहायला मिळत आहे. तसेच जगानेच या म्हशीची दखल घेतल्यानंतर तिला पाहण्यासाठी दुरून दुरून लोक येत आहेत.

बुटक्या राधा विषयी…

नाव – राधा

वैशिष्ट्य – जगातील सर्वात बुटकी पाळीव म्हैस

उंची – 83.8 सेमी (2 फूट 8 इंच)

ठिकाण – मलवडी, ता. माण, जि. सातारा, महाराष्ट्र

म्हशीचे मालक – अनिकेत बोराटे

 

Published on: Nov 12, 2025 01:57 PM