Manoj Jarange: हैदराबादचा जीआर काढला, मग कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप का नाही? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल
Manoj Jarange Questions Over Shinde Committee Hyderabad Visit: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. ते 7 ते 21 डिसेंबरदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहेत. तसेच शिंदे समितीच्या दौऱ्यावर मनोज जरांगेंनी सवाल केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता राज्यव्यापी दौरा करणार आहेत. 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र, प्रमाणपत्राची वैधता आणि आरक्षणासंदर्भातील विविध अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न या दौऱ्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा दौरा चार ते पाच टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पूर्ण दिवस दिला जाणार आहे. या दौऱ्यात कोणत्याही सभा किंवा बैठका आयोजित केल्या जाणार नाहीत. त्याऐवजी मराठा समाजातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या जाणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या दिवशी जाणार, याचे वेळापत्रक 1 डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहे.
हैदराबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीवरूनही मनोज जरांगे यांनी सरकारला लक्ष्य केले. सरकारने एक वर्षापूर्वी हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढला आहे. शिंदे समिती 25, 26 आणि 27 डिसेंबर रोजी हैदराबादला जाऊन जुन्या नोंदी शोधणार आहे. मात्र समिती नेमक्या कोणत्या नोंदी शोधण्यासाठी जात आहे, हे नंतर स्पष्ट होईल, असे मनोज जरांगे म्हणाले. या कामासाठी नोंदी वाचणारे अभ्यासक सोबत असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्यासाठी एक वर्षापूर्वी जीआर काढण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होत असल्याचा दावा त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रासाठीही जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. सातारा आणि कोल्हापूर संस्थानच्या नोंदींचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले. सरकारच्या बाजूने बोलणाऱ्यांनी आता सरकारला जाब विचारावा. हैदराबाद गॅझेटिअरचा जीआर काढल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप अपेक्षित वेगाने का होत नाही, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, गरीब मराठा समाजातील तरुणांनी संघर्ष करून हे मिळवले आहे. त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाने सरकारकडे ठामपणे मागणी लावून धरली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. एकीकडे हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदींचा शोध आणि दुसरीकडे राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न, अशा दोन आघाड्यांवर जरांगे सक्रिय होणार आहेत.