2014 मध्येही शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा प्रस्ताव होता, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी मैत्री तोडून राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणला. हा भूकंप कदाचित पाच वर्षांपूर्वीच येणार होता. मात्र, काँग्रेसच्या नकारामुळे ते शक्य होऊ शकले नाही.

Prithviraj Chavan, 2014 मध्येही शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा प्रस्ताव होता, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

मुंबई : “शिवसेनेकडून 2014 मध्येही सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसने नकार दिल्यामुळे ते शक्य होऊ शकले नाही”, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एका ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आज 50 दिवस पूर्ण होत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी मैत्री तोडून राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणला. हा भूकंप कदाचित पाच वर्षांपूर्वीच येणार होता. मात्र, काँग्रेसच्या नकारामुळे ते शक्य होऊ शकले नाही.

“भाजपने 2014 साली अल्प मतांवर सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेकडून आघाडीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी प्रस्ताव आला होता. यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावेळी काँग्रेसला कमी जागांवर यश आले होते. त्यामुळे आम्ही विरोधात बसणार हे निश्चित होते. राजकारणात जय-पराजय होत असतात”, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

“2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपकडून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या 40 आमदारांना धमकीचे आणि आमिषाचे फोन येऊ लागले. तेव्हाची परिस्थिती बघता शिवसेना आणि भाजप यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला. सुरुवातीला या प्रस्तावाला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहमत नव्हत्या. मात्र, अनेक चर्चांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागांवर भाजपला यश मिळाले होते. तर शिवसेनेला 63 जागांवर यश मिळाले होते. मात्र, मंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांचे एकमत न झाल्याने भाजपने अल्पमतांचे सरकार स्थापन केले. बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला आणि शिवेसनेचे सर्व आमदार सभागृहाबाहेर गेले. त्यावेळी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे आवाजी मतदानाच्या आधारावर भाजप सत्ता टिकवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर एक महिन्यांनी शिवसेना सत्तेत सामील झाली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *