शिवसेना नेत्यांनी भाषण करताना रोखलं, मराठीसक्ती केल्याचा झेन सदावर्तेचा आरोप

मराठी भाषेत बोलत नसल्यामुळे शिवसेना नेत्यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात आपलं भाषण अर्ध्यावर थांबवलं, असा दावा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या झेन सदावर्तेने केला आहे Zen Sadavarte allegations on Shivsena Leaders

शिवसेना नेत्यांनी भाषण करताना रोखलं, मराठीसक्ती केल्याचा झेन सदावर्तेचा आरोप

मुंबई : भारतात राहायचं असेल, तर मराठी शिकावंच लागेल, असा इशारा देत मुंबईत शिवसेना नेत्यांनी आपल्याशी धाकदपटशा केला, असा गंभीर आरोप राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या झेन सदावर्ते हिने केला आहे. महिला दिनीच आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याचा दावा झेनने केला आहे. (Zen Sadavarte allegations on Shivsena Leaders)

मराठी भाषेत बोलत नसल्यामुळे शिवसेना नेत्यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात आपलं भाषण अर्ध्यावर थांबवलं, असा आरोप झेन सदावर्ते हिने ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

‘मला मराठी नीट येत नाही. मी हिंदी आणि इंग्रजीत दिलेला संदेश सगळ्यांपर्यंत पोहचतो. मात्र मंचावर बसलेल्या लोकांना काय झालं, मला समजलंच नाही. चिडून त्यांनी माझ्यावर हल्लाबोल केला. व्यासपीठावर शिवसेना नेतेही उपस्थित होते’ असं झेनने सांगितलं.

‘मी देशाशी निगडित अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. देशात काय चुकीचं चाललं आहे, हे मी सांगत होते. शनिवार-रविवारी बालकांना मध्यान्ह भोजन दिलं जात नाही, तृतीयपंथीयांना आरक्षण मिळालं नाही, याविषयी मी बोलले’ असं झेन म्हणाली.

‘मी बोलत असताना, शिवसेना आमदार आणि नेत्यांना काय झालं, हे मला समजलंच नाही. त्यांनी माझा अपमान करायला सुरुवात केली. त्यांनी खोटा आरोप केला, की त्यांनी आरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रातील असल्यामुळे आपल्याला अधिक माहिती असल्याचा दावाही शिवसेना नेत्यांनी केला’ असा आरोप झेनने केला आहे.

‘आपल्याला इच्छित भाषेत बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. हे लोक आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं शोषण करत आहेत. मला इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. ‘तुला भारतात राहायचं असेल तर, मराठी शिकण्याची आवश्यकता आहे’ असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिल्याचा दावाही झेनने केला.

कोण आहे झेन सदावर्ते? 

झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायलयातील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी आहे. 22 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईच्या हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर या इमारतीत आग लागली होती. झेनच्या प्रसंगावधानामुळे तब्बल 17 जणांचा जीव वाचला होता. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने झेन सदावर्तेचा गौरव केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवरच्या 16 व्या मजल्यावर राहत होते. अचानक लागलेल्या आगीच्या प्रसंगी लहानग्या झेनने आपल्या आईवडिलांना शांत केले. त्यानंतर प्रसंगावधान राखत घरातील सुती कपडे ओले केले आणि ते नाकाशी धरुन शांतपणे श्वास घेण्यास सांगितले.

झेन डॉन बॉस्को इंटरनॅशनल शाळेत शिकते. शाळेत आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे दिले जातात, याचाच तिने योग्य पद्धतीने वापर केला होता. आईवडिलांसह जवळपास 15 जणांना तिने बाल्कनीत बसवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने हे सर्व बाहेर आले.

Zen Sadavarte allegations on Shivsena Leaders

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *