बिहारमध्ये काँग्रेसला अजून मोठा झटका बसण्याची शक्यता, काय आहे कारण?

| Updated on: Jan 06, 2021 | 3:25 PM

काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी पक्षाचे काही आमदार रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं सांगत, बिहारमधील पक्षाचं वास्तव सांगितलं आहे.

बिहारमध्ये काँग्रेसला अजून मोठा झटका बसण्याची शक्यता, काय आहे कारण?
Follow us on

नवी दिल्ली: बिहार बिधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर प्रदेश काँग्रेसला मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी बिहारमध्येच काँग्रेसला अजून एक मोठा झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, पक्षाचे 19 पैकी 11 आमदार काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. असं झाल्यास काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जाईल. (11 Congress MLAs in Bihar preparing to quit?)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल यांची विनंती मान्य करत पक्षनेतृत्वाने त्यांना बिहार प्रभारीच्या पदावरुन मुक्त केलं आहे. गोहिल यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या घडामोडीनंतर काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं पक्षातीलच काही नेत्यांचं म्हणणं आहे.

काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी पक्षाचे काही आमदार रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं सांगत, बिहारमधील पक्षाचं वास्तव सांगितलं आहे. लवकरच पक्षात मोठी फूट पडणार आहे. पक्षाचे अर्ध्याहून अधिक आमदार काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. एकूण 11 आमदार पक्ष सोडतील अशी शक्यता भरत सिंह यांनी व्यक्त केलीय.

‘पैसे देऊन तिकीट विकत घेतले’

‘काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार असे आहेत ज्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली असली तरी ते काँग्रेसचे नाहीत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट घेतलं आणि आमदार झाले’, असा गौप्यस्फोटही भरत सिंह यांनी केला आहे.

काँग्रेस आमदार NDAमध्ये सहभागी होणार?

NDA आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी NDAमधील अनेक नेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत, असा दावा भरत सिंहांनी केलाय. दरम्यान त्यांचा हा दावा काँग्रेस नेते फेटाळत आहेत. काँग्रेस पक्ष एकसंध आणि एकजूट असल्याचं काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश सिंह यांनी म्हटलंय.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव

नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 243 पैकी 70 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील अवघ्या 19 जागांवर काँग्रेसला विजय मिळवता आला. निवडणूक निकालानंतर महाआघाडीत सहभागी पक्षांनीही पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडलं.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही, पण राहुल गांधींनी चांगला प्रचार केला; काँग्रेस नेत्याकडून पाठराखण

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस

11 Congress MLAs in Bihar preparing to quit?