
दिल्लीतील लाडक्या बहिणींच्या खात्यात 2500 रुपये कधी जमा होणार, याबद्दल मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी TV9 च्या महामंच ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ मध्ये उत्तर दिले आहे. यावेळी रेखा गुप्ता यांनी आम आदमी पार्टीवर हल्लाही केला आहे. आम आदमी पार्टी सतत विचारत आहे की, महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार? याबद्दल मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, सध्या त्यांच्याकडे काही काम नाही, म्हणून ते आमच्या संकल्प पत्राचे बारकाईने वाचन करत आहेत.
आज मी त्यांना (आम आदमी पार्टी) विचारू इच्छिते की, गेल्या दहा वर्षात जे वादे केले, त्यांपैकी काही वादे पूर्ण होऊ शकली का? त्यांनी म्हटले होते की वाय-फाय देऊ. दिल्लीचे लोक विचारत आहेत की, वाय-फाय कधी येईल? 2018 पूर्वी प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिले होते, ते मिळाले का? लोकांना घरं मिळाली का? त्यांनी म्हटले होते की यमुना स्वच्छ होईल, ती स्वच्छ झाली का? कचऱ्याचे डोंगर हटवले का?, असा प्रश्नांचा पाऊसच मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पाडला.
तुम्ही काही केले नाही आणि दुसऱ्याला प्रश्न विचारत आहात. पंजाबमध्ये महिलांना एक हजार रुपये देण्याचे वचन दिले होते, पण तीन वर्षे झाली तरी ते पैसे दिले नाहीत. लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या महिलांना हजार रुपये देण्याचे वचन दिले होते, ते दिले का? आमची योजना कायमची आहे. ती योजनाबद्ध पद्धतीने लागू केली जाईल, असं त्या म्हणाल्या.
बजेट पास झाल्यावरच योजना लागू होतात, असेही मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी सांगितले. आज सरकारला एक महिना झाला आहे. बजेट पास झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो. त्यांना माहीत आहे की, ते दिल्लीचे बजेट रिकामे करून गेले आहेत. महिलांना पैसे मिळावेत म्हणून आण्ही बजेटमध्ये 5100 कोटी रुपये दिले आहेत. आमचा विश्वास आहे की या योजनेत कोणतीही महिला वंचित राहणार नाही. बजेट पास झाल्यावर योजना लागू होतात. लवकरच महिलांना अडीच हजार रुपये मिळतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.