कोई तो बचा लो भैया… त्यांचा आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा, अख्खी ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली; मृत्यूचं तांडव

| Updated on: Oct 02, 2022 | 9:24 AM

या दुर्घटनेत 29 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. यावेळी जखमींना गावातील सामुदायिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आलं.

कोई तो बचा लो भैया... त्यांचा आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा, अख्खी ट्रॅक्टर ट्रॉली तलावात कोसळली; मृत्यूचं तांडव
कोई तो बचा लो भैया... त्यांचा आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कानपूर: रुग्णालयात (hospital) नजर टाकावी तिथे मृतदेहच दिसून येत होते… मृत्यूचं हे तांडव पाहून प्रत्येकजण हादरून जात होता… जखमी आणि मृतांच्या (death) नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश सुरू होता… तिथे बसलेल्या महिला टाहो फोडून रडत होत्या… त्यांचं देहभान हरपलं होतं… भैया कोई तो बचा लो… असा त्यांचा आक्रोश सुरू होता… काळीज पिळवटून टाकणारा हा आक्रोश ऐकून प्रत्येकाच्याच काळजाचा थरकाप उडत होता… हे भीषण दृश्य आहे, उत्तर प्रदेशातील कानपूर (kanpur) जिल्ह्यातील रुग्णालयातील. येथील भदेऊना गावाजवळ शनिवारी प्रवाशांनी खच्चून भरलेली एक ट्रॅक्ट ट्रॉली तलावात उलटली. या अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला. अनेकजण गंभीर झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पीडितांना पाहिजे ती मदत देण्याचे आदेशही देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी विशाख जी अय्यर यांनी सांगितलं. दरम्यान, प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप जखमी आणि स्थानिकांनी केला आहे.

या घटनेनंतर साढ पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंद कुमार पांडेय यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सपा आणि बसपा नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनीही अधिकाऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केवळ कृषी कामासाठीच करावा, प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी वापर करू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. कानपूरमधील ट्रॅक्टर ट्रॉलीच्या दुर्घटनेची बातमी ऐकून दु:ख झालं. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे, त्यांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे वाटावे ही प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वोतोपरी मदत करत आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

असा झाला अपघात

फतेहपूरच्या चंद्रिका देवी मंदिरात एका मुंडण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला तब्बल 50 लोक गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण ट्रॅक्टर ट्रॉलीत बसून घाटमपूरला जात होते. त्याचवेळी रस्त्यात ही ट्रॉली पलटी झाली आणि तलावात पडली.

या दुर्घटनेत 29 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. यावेळी जखमींना गावातील सामुदायिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आलं.

दुर्घटना घडल्यानंतर काही लोकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या. त्यामुळे ते वाचू शकले. मात्र, ज्यांना पोहता येत नव्हते त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.