
पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. भारत हल्ला करू शकतो अशी भीती असल्यामुळे आता पाकिस्तानने पीओकेच्या रावलकोटमध्ये सैन्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. मोठ्या संख्येनं सैन्य तैनात करण्यात आलं आहे.
याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, पाकिस्तान भूकंपाने हादरलं आहे. पाकिस्तानात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप पाकिस्तानमध्ये झाला आहे. या भूकंपामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या भूकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतानं हल्ला झाल्यापासून ते आतापर्यंत सहा मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, दुसरा मोठा निर्णय म्हणजे अटारी बॉर्डर बंद करण्यात आली असून, आयात-निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. त्यांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. टपाल सेवाही बंद करण्यात आली असून, पाकिस्तानच्या अनेक चॅनल देखील बंद करण्यात आले आहेत.
पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या
दरम्यान दुसरीकडे भारत हल्ला करू शकतो, या भीतीनं पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानने पीओकेच्या रावलकोटमध्ये सैन्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. मोठ्या संख्येनं सैन्य तैनात करण्यात आलं आहे. दुसरीकडे वारंवार पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर शस्त्रासंधीचं उल्लंघ सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
तुर्कीचा पाठिंबा
तुर्कीनं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे, रविवारी तुर्कीच्या नौवदलाचं जहाज पाकिस्तानमध्ये दाखल झालं आहे. कराचीमध्ये हे जहान दाखल झालं आहे. सद्भावना म्हणून हे जहाज पाकिस्तानात आल्याचा दावा, पाक सरकारने केला आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर याकडे एका वेगळ्या दृष्टीकोणातून पाहिलं जातं आहे.