
देशातील अनेक नेते हे हिंदूच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करतात. हम दो, हमारे दो, या धोरणाने हिंदूचे नुकसान केल्याचा आरोप होतो. तर मुस्लिमांची संख्या झपाट्याने वाढल्याचा दावा ही करण्यात येतो. तामिळनाडूचे गव्हर्नर आणि आसामाचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हा विषय उचलून धरला होता. 2041 पर्यंत आसाममधील हिंदू अल्पसंख्यांक होतील, अशी भीती सरमा यांनी मांडली. तर राज्यपाल एन. रवी यांनी आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक भागात हिंदूच्या लोकसंख्येवर मोठी चिंता व्यक्त केली आहे. तर आता प्यू रिसर्चने जगाला चिंतेत टाकले आहे. जगाच्या नकाशावरून गेल्या दहा वर्षात 4 ख्रिश्चन देश कमी झाल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
कुठे गेले ख्रिश्चन?
जगात 2010 मध्ये ख्रिश्चन बहुल देशांची संख्या 124 इतकी होती. ती 2020 मध्ये म्हणजे 10 वर्षांत 120 वर आली. कारण या देशातील ख्रिश्चन लोकसंख्या घटली. लोकसंख्येचा वृद्धीदर घसरला. अनेक लोक नास्तिक झाले. काहींनी धर्म परिवर्तन केले. त्यामुळे या देशातील ख्रिश्नन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटली. या देशात ख्रिश्चन अल्पसंख्यांक होत आहेत. त्यातील अनेकांनी तर स्वतः पुढील धर्माचा रकाना रिक्त सोडला आहे. त्यांना त्यांच्या नावासमोर कोणत्याही धर्माचे लेबल नको आहे. ते नास्तिक, अज्ञेयवादी झाले आहेत. या सर्व कारणांमुळे ख्रिश्चन धर्म मानणारी लोकसंख्या कमी झाली आणि 10 वर्षांत जगातील 4 ख्रिश्चन बहुल देशाची संख्या 4 ने घटली.
कोणते आहेत ते चार देश?
ख्रिश्चन बहुल असणारी या देशातील धार्मिक स्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी या ठिकाणी ख्रिश्चन जीवनशैली मानणाऱ्यांची संख्या जास्त होती. आता ही संख्या झपाट्याने घटली आहे. यामध्ये युनायटेड किंगडम, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया ही प्रगत राष्ट्रे आणि उरुग्वे सारख्या देशाचा समावेश आहे. आता इंग्लंडमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या 49 टक्क्यांवर आली आहे. उरुग्वेमध्ये निधर्मींची संख्या 52 टक्क्यांवर आली आहे. या देशात ख्रिश्चन लोकसंख्या 44 टक्क्यांवर आली आहे. ऑस्ट्रेलियात 47 टक्के तर फ्रान्समध्ये ख्रिश्चन लोकसंख्येचा आकडा 46 टक्क्यांवर आला आहे. तर इतर ख्रिश्चन देश सुद्धा याच वाटेवर आहेत. नेदरलँडमध्ये निधर्मींचा आकडा 54 टक्क्यांवर तर न्युझीलंडमध्ये ही लोकसंख्या 51 टक्क्यांवर पोहचल्याचे या अहवालात म्हटले आहे.
मग हिंदूची स्थिती काय?
जगात हिंदू बहूल देश केवळ दोनच आहेत. त्यात भारतात 95 टक्के तर 5 टक्के हिंदू हे जगातील कानाकोपऱ्यात, विविध देशात राहतात. नेपाळमध्ये हिंदूची संख्या मोठी आहे. जगातील एकूण लोकसंख्येत हिंदूचा वाटा अवघा 15 टक्के इतका आहे. काही आफ्रिकन आणि युरोपियन देशात हिंदू धर्माचे अनुयायी वाढत असल्याचा दावा करण्यात येतो. जगात 60 टक्के देश हे ख्रिश्चन बहूल आहेत.