गुजरात पुल दुर्घटनेबाबत धक्कादायक अपडेट; 77 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

| Updated on: Oct 30, 2022 | 11:09 PM

या दुर्घटनेत आता पर्यंत 77 हून अधिक जणांचा मत्यू झाला आहे. 200 हून अधिक जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.

गुजरात पुल दुर्घटनेबाबत धक्कादायक अपडेट; 77 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
Follow us on

अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला. पुलावर उपस्थित असलेले 500 जण नदीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या दुर्घटनेत आता पर्यंत 77 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 200 हून अधिक जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. गुजरात पुल दुर्घटनेबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

नुकतेच या पुलाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वीच पुलाचं लोकार्पण करण्यात आले. यामुळे पुलाच्या नुतनीकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

मागील सात महिन्यांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. नूतनीकरणाचे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले. नुतनीकरणाच्या कामासाठी हा पुल बंद होता.

पूल सुरू झाल्यामुळे रविवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या कुटुंबीयांसह फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी पुलावर पोहोचले होते. पुलाची लांबी 200 मीटरपेक्षा जास्त होती. रुंदी सुमारे 3 ते 4 फूट होती.

पूल जेव्हा कोसळला, तेव्हा 400 हून अधिक लोक पुलावर उपस्थित होते. अपघातात जवळपास 77 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 70 जखमींना वाचवण्यात यश आले आहे. याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नदीत पडलेल्या लोकांना नदीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

स्थानिक नागरीकही बचावकार्यात पोलीस आणि प्रशासनाला मदत करत आहेत. NDRF च्या 2 टीम मोरबीला रवाना झाल्या आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचावकार्यासाठी तातडीने पथके पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहे.