भारतातील 5 सर्वात सुंदर रेल्वे स्थानक, महाराष्ट्रातील या रेल्वे स्थानकाचा समावेश

भारतातील रेल्वे स्थानकाचं जाळं खूप मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लोकं रेल्वेचा प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा खूपच कमी दरात होतो. पण रेल्वे यासह अनेक चांगल्या सुविधा देखील पुरवते. कोणते आहेत भारतातील ५ सर्वात सुंदर रेल्वे स्थानक जाणून घ्या.

भारतातील 5 सर्वात सुंदर रेल्वे स्थानक, महाराष्ट्रातील या रेल्वे स्थानकाचा समावेश
| Updated on: Jun 03, 2024 | 7:49 PM

भारतातील बहुतांश लोक रेल्वेनेच नेहमी प्रवास करतात. या दरम्यान ते वेगवेगवळ्या रेल्वे स्टेशनवरुन जात असतात. पण देशातील काही रेल्वे स्थानके हे इतके सुंदर आहेत की, जसे मोठे विमानतळ किंवा 5 स्टार हॉटेल आहेत असे दिसतात. या रेल्वे स्थानकांचे सौंदर्य आणि उत्कृष्ट नक्षीकाम सर्वांना आकर्षित करतात. या रेल्वे स्थानकांवर अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळतात. अत्याधुनिक वैशिष्ट्यांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या या रेल्वे स्टेशनबद्दल जाणून घेऊया.

राणी कमला रेल्वे स्टेशन

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे असलेले राणी कमला पती रेल्वे स्थानक हे जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक आहे. येथे प्रवाशांना विमानतळावर मिळतात तशा सुविधा मिळतात. राणी कमलापती रेल्वे स्थानक हे जर्मनीतील हेडलबर्ग रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना शॉपिंग मॉल, हॉस्पिटल, स्मार्ट पार्किंग, उच्चस्तरीय सुरक्षा यासह अनेक सुविधा मिळतात. हे देशातील पहिले ISO-9001 प्रमाणित रेल्वे स्टेशन आहे.

चारबाग रेल्वे स्टेशन

नवाबांच्या शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन म्हणजे चारबाग. या रेल्वे स्थानकाची रचना येथे येणाऱ्या प्रवाशांना मंत्रमुग्ध करत असते. चारबाग रेल्वे स्थानकाची पायाभरणी बिशप जॉर्ज हर्बर्ट यांनी २१ मार्च १९१४ रोजी केली होती. त्यानंतर 1923 मध्ये या रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावेळी हे रेल्वे स्टेशन 7 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले होते. लखनौचे हे रेल्वे स्टेशन पाहण्यासाठी लांबून पर्यटक येत असतात.

बनारस रेल्वे स्टेशन

धार्मिक नगरी वाराणसीमध्ये भाविकांची नेहमीत वर्दळ असते. पर्यटनाचे मुख्य केंद्र म्हणजे येथील तीर्थक्षेत्रेच नव्हे तर बनारस रेल्वे स्थानक देखील आहे. बनारस रेल्वे स्थानकाचे नाव मंडुआडीह होते, परंतु आता ते पुन्हा बांधले गेले आहे आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज झाले आहे. यात व्हीआयपी लाउंजसह उच्च दर्जाचे खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील आहेत. इतकंच नाही तर आरामासाठी एसी रूमही बनवण्यात आल्या आहेत. येथे येणारे पर्यटक अनेकदा या रेल्वे स्थानकाचा आनंद घेतात.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन

देशाची राजधानी नवी दिल्ली हे सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक असलेले स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाची संरचना आजही लोकांना भुरळ घालते. येथे दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. येथे अनेक उच्चस्तरीय सुविधा दिल्या जातात. प्रवाशांना सर्वात मोठी समस्या रेल्वे स्थानकावर सामान ठेवण्याची आहे. पण दिल्ली रेल्वे स्थानकावर तुम्हाला तुमचे सामान ठेवण्याची सुविधा अगदी कमी खर्चात मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक

मुंबई हे भारतातील मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक आहे. हे रेल्वे स्टेशन ताजमहाल नंतर भारतातील सर्वात जास्त छायाचित्रित स्मारकांपैकी एक आहे. व्हिक्टोरियन गॉथिक शैलीमध्ये हे बांधले गेले आहे. भारतीय वास्तुकलेच्या घटकांचे हे मिश्रण आहे. हे रेल्वे स्थानक समृद्ध इतिहासासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 1996 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला. हे रेल्वे स्थानक पर्यटकांची पहिली पसंती आहे जे पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात.