ठाणे महापालिकेत मनसेची मोठी युती, जागावाटपाचा आकडा आला समोर, कोणाला मिळणार किती जागा?
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेच्या संभाव्य जागावाटपावर चर्चा झाली.

आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ठाणे महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेला शिंदे गटाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने आतापासूनच कंबर कसली आहे. ठाण्यात मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि महाविकासआघाडी एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या नाद या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेतेही उपस्थित होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. विशेष म्हणजे, मनसेचे नेते अविनाश जाधव आणि ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे हे देखील यावेळी उपस्थित होते.
अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एकूण जागांपैकी शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाला ५० ते ५५ जागा मिळू शकतात. तर राष्ट्रवादी शरद पवार गट ३५ ते ४० जागांवर निवडणूक लढवू शकते. त्यापाठोपाठ मनसे ३१ ते ३२ जागांवर निवडणूक लढवतील, असे म्हटले जात आहे. तर काँग्रेस ५ ते १० जागांवर निवडणूक लढवेल, अशी माहिती समोर आली आहे. या जागावाटपावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. तरी आज किंवा उद्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. काही जागांवर मित्रपक्षांनी अधिक दावा केल्याने तिथे अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता
दरम्यान ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी महाविकास आघाडीने सर्व ताकद पणाला लावली आहे. मनसेला सोबत घेऊन व्यापक आघाडी करण्याचा प्रयत्न या बैठकीतून दिसून येत आहे. जर मनसे या आघाडीत सामील झाली, तर ठाण्यातील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. आता जागावाटपाचा हा पेच सुटल्यानंतर लवकरच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल, असे संकेत नेत्यांनी दिले आहेत.
