
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाहिद खान आफ्रिदीबाबत एक धक्कादायक दावा केला जात आहे. पाकिस्तानी न्यूज मीडियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सांगितले जात आहे की पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे निधन झाले आहे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण शाहिद आफ्रिदी गेल्या काही दिवसांत खूप जास्त सक्रिय असल्याचे दिसत होते. इतकेच नव्हे, तर नेहमीप्रमाणे त्याचे वादग्रस्त वक्तव्येही ऐकायला मिळाली होती. मग, त्याच्या मृत्यूबाबत केला जाणारा दावा कितपत खरा आहे?
व्हायरल व्हिडीओमध्ये काय सांगितले आहे?
सध्या या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांनाच हैराण केले आहे. आफ्रिदीचे चाहते त्याच्या आरोग्याबाबत चिंतेत आहेत. पण हा व्हिडीओ नेमका आहे तरी काय? आणि आफ्रिदीच्या मृत्यूचा दावा कोण करत आहे? खरे तर, इन्स्टाग्रामवर एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो एखाद्या पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा आहे. या व्हिडीओमध्ये दोन अँकर स्टुडिओत बसलेले दिसत आहेत. महिला अँकर बातमी वाचत आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद खान आफ्रिदीचे निधन झाले आहे. कराचीमध्ये त्याचे दफन करण्यात आले आहे.
काय आहे सत्य?
व्हिडीओमध्ये अँकरला असेही म्हणताना ऐकू येते की, आफ्रिदीच्या निधनावर अनेक अधिकाऱ्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल आहे. पण हे खरे आहे का? खरंच आफ्रिदीचे निधन झाले आहे का? खरे तर हा व्हिडीओ आणि मृत्यूचा दावा पूर्णपणे खोटा आहे. या व्हिडीओमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) च्या मदतीने अँकरला पाकिस्तान क्रिकेट संघ आणि शाहिद खान आफ्रिदी यासारख्या शब्दांचा वापर करताना दाखवले गेले आहे. यामुळे असे वाटते की जणू शाहिद आफ्रिदीचे निधन झाले आहे.
पाकिस्तानी नेत्याच्या मृत्यूचे चुकीच्या पद्धतीने प्रदर्शन
सत्य मात्र काही वेगळेच आहे. हा व्हिडीओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा पाकिस्तानात एका प्रसिद्ध आफ्रिदीचा मृत्यू झाला आहे. नुकतेच पाकिस्तान मुस्लिम लीग (N) चे नेते अब्बास खान आफ्रिदी यांचे निधन झाले होते. त्यांचा मृत्यू घरात गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात झाला होता. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्यातून ते सावरू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. असे दिसते की, ही बातमी सांगताना अँकरचा हा व्हिडीओ त्यांच्याशीच संबंधित आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तो चुकीच्या पद्धतीने सादर करून अफवा पसरवली गेली आहे.