Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंसाठी सोनाक्षी सिन्हा मैदानात, कमेंट करत म्हणाली…
अभिजीत दिपकेंसाठी सोनाक्षी सिन्हा मैदानात उतरली आहे. काही दिवसांपूर्वी दिपकेंच्या आजीचं निधन झालं. या दु:खद काळात सोनाक्षीने त्यांना धीर देण्याचे काम केलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सीजेपीने देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने 10 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक दिली होती. परंतु त्याच दिवशी अभिजीत दिपकेंना विमानातून ताब्यात घेण्यात आलं. त्याचदिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं देखील निधन झालं. परंतु पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दिपकेंना आजीच्या अंतिम दर्शनाला जाता आलं नाही. दिपकेंनी लाडक्या आजीसाठी पोस्ट केली. या पोस्टवर सोनाक्षी सिन्हाने कमेंट केली आहे.
अभिजीत दिपकेंची आजी सावित्रीबाई दिपके यांचं वयाच्या 85 व्या वर्षी हिंगोलीतील संतुक पिंपरीत निधन झालं. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दिपकेंना आजीचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही. दिपकेंची 11 ऑक्टोबर रोजी दिवशी सुटका झाल्यानंतर रात्री स्मशानभूमीत जाऊन फुलं वाहिली. त्याने फुले वाहून आजीला नमस्कार केला. त्यावेळी अभिजीत दिपकेंना अश्रू अनावर झाल्या. अंत्यदर्शनाला यायला न जमल्याने अभिजीत दिपकेंनी सोशल मीडियावर आजीचा फोटो टाकून ‘आय एम सॉरी’ म्हणत माफी मागितली. दिपकेंच्या पोस्टवर अनेकांनी त्याच्या आजीला श्रद्धांजली वाहिली. त्याच्या पोस्टवर सेलिब्रिटी मंडळींनी देखील कमेंट्स केल्या. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं देखील दिपकेंच्या दु:खाच्या काळात पुढे आली. तिने कमेंट्स करत म्हटलं की, ‘अभिजीत, तुमच्यावर ओढावलेलं दु:ख मोठं आहे. मी मनापासून शोक व्यक्त करते. त्यांना तुमचा अभिमान वाटत असेल. त्या तुमची पाठीशी असतील’. तर अभिनेत्री फातिमा सना शेखनेही कमेंट केली आहे. फातिमाने म्हटलं की, खंबीर राहा! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तिला तुझा नक्कीच खूप अभिमान वाटेल…’.
दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
अभिजीत दिपकेंना आजीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. यावरून त्यांनी दिल्ली पोलिसांवर आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांमुळे अंत्यसंस्काराला पोहोचता आले नाही, असा त्यांचा आरोप आहे. आंदोलक विद्यार्थ्याला विमानातून ताब्यात घेणे आणि आजीच्या अंत्यविधीसाठी न सोडणं अमानुष आणि अन्यायकारक आहे, असे म्हणत दिपकेंच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला होता.
