विमानात घुसून अभिजीत दीपकेंना पकडलं, सीजेपीचा भडका; दिल्लीत मोठ्या घडामोडी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनासाठी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे दिल्लीत आले. विमानतळावर उतरताच पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्याच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनासाठी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे दिल्लीत आले होते. पण विमानतळावर उतरण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी विमानात घुसून अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सीजेपीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी जंतरमंतरवर आंदोलन होणार असल्याचं सीजेपीच्या सूत्रांनी सांगितलं.
अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी सकाळी साडे सातच्या सुमारास मुंबईवरून दिल्लीला जायला निघाले. अभिजीत दीपके, सौरव आणि आशुतोष तिघेही 10.45च्या सुमारास दिल्ली विमानतळावर आले. मात्र पोलिसांनी विमानात जाऊन दीपके आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी दीपके यांनी सरकारचा जोरदार निषेध नोंदवला.
दीपके आणि त्यांचे सहकारी येणार म्हणून दिल्ली विमानतळाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे विमानतळाला छावणीचं स्वरूप आलं आहे. दीपकेंना ताब्यात घेतलं असून त्यांना थोड्याच वेळात बाहेर आणलं जाणार आहे. त्यानंतर पोलीस त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत. मात्र, त्यांना कोणत्या पोलिस स्टेशनला नेणार हे अद्याप स्पष्ट नाहीये.
500 जणांची धरपकड
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कालपासून सीजेपीच्या 500 कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सीजेपीचं आंदोलन मोडीत काढायचं, अशा पद्धतीने दिल्ली पोलीस ही कारवाई करत आहे. दिल्लीत रॅपिड एक्शन फोर्सचा तुकडीची रस्त्यावरून पेट्रोलिंग सुरू आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर हजारोंच्या संख्येने रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान तैनात आहेत. मागच्या आंदोलनाचा अनुभव घेता दिल्ली पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
दिल्लीत मंडी हाऊस मेट्रो स्टेशनबाहेर पाच किलोमिटर परिसरात इंटरनेट, फोन सेवा बंद करण्यात आली आहे. जंरत मंतरवरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. संपूर्ण दिल्लीत कलम 163 कलम लागू करण्यात आला आहे. आंदोलक अजून जंतरमंतरवर आलेले नसले तरी जंतरमंतर परिसरात रॅपिड अॅक्शन फोर्स, दंगल नियंत्रण पथक आणि मोठ्या व्हॅन तैनात आहेत.
