Tulasi Plant : कोणत्या दिवशी तुळशी रोप लावावं, रोप सुकणे अशुभ आहे का? जाणून घ्या शास्त्र काय सांगतं!
Tulasi Plant : कधीकधी घरातील तुळशीचे रोप अचानक सुकतं. पुरेसे पाणी आणि सूर्यप्रकाश देऊनही रोप सुकल्यास अनेक लोकांना काळजी वाटते. अशात काय केलं पाहिजे आणि तुळशीचं रोप कोणत्या दिवशी लावलं पाहिजे जाणून घ्या...

Tulasi Plant : हिंदू धर्मात तुळस फक्त एक रोप नाही तर, तिला धार्मिक महत्त्व आहे. धार्मिक कार्यात देखील तुळशीचा वापर केला जातो. पण अनेकदा असं होतं की, तुळशीचं रोप सुकतं. त्यामुळे काही अशुभ होईल… अशी शंका अनेकांच्या मनात येते. तुळशीबद्दल सांगायचं झालं तर, तुळस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय मानली जाते. म्हणूनच अनेक लोक आपल्या घरात तुळशीची रोपे लावतात आणि दररोज सकाळी व संध्याकाळी तिची पूजा करतात. भक्तांचा असा विश्वास आहे की, ज्या घरात तुळस असते त्या घराला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात सुख-समाधान येते. वास्तु परंपरेनुसार, दररोज तुळशी समोर दिवा लावणं देखील शुभ मानलं जातं.
मात्र, कधीकधी घरातील तुळशीचे रोप अचानक सुकतं. पुरेसे पाणी आणि सूर्यप्रकाश देऊनही रोप सुकल्यास अनेक लोकांना काळजी वाटते. वास्तुशास्त्रानुसार, काही जण तुळशीचं रोप सुकणं हे येणाऱ्या धोक्याचं लक्षण न मानता, घरात एखादं मोठं संकट येत असल्याचं लक्षण मानतात. पण, रोप सुकण्याची नैसर्गिक कारणंही असू शकतात, जसं की पाण्याची कमतरता, अति उष्णता आणि कीड.
वाळलेल्या तुळशीच्या रोपाचं काय करावं?
वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक परंपरेनुसार, वाळलेले तुळशीचं रोप जास्त काळ कुंडीत ठेवू नये. ते आदराने काढून पवित्र ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जित करावं, असं सुचवलं जातं. पण, पर्यावरणाचा विचार करून आणि पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून, ते रोप पवित्र ठिकाणी मातीत गाडणं देखील उत्तम आहे.
तुळशीचे नवीन रोप केव्हा लावावे? जुने, वाळलेले तुळशीचं रोप काढून टाकल्यानंतर, त्या कुंडीत नवीन रोप लावता येतं. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे नवीन रोप लावण्यासाठी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस शुभ मानले जातात. या दिवशी तुळस लावणे शुभ मानले जाते.
नवीन रोप लावताना, त्याला चांगली माती, पुरेसे पाणी आणि सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करा. तुळशीचे रोप निरोगीपणे वाढावे यासाठी योग्य काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही या आध्यात्मिक श्रद्धा तसेच रोपांच्या काळजीची खबरदारी पाळली, तर तुम्ही घरी तुळस हिरवीगार आणि निरोगी वाढवू शकता.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
