महाराष्ट्रानंतर आता या राज्यात भाजपचं ऑपरेशन लोटस, या पक्षात मोठी फूट?

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात ज्या प्रकारे दोन पक्ष फुटले तशीच स्थिती आणखी एका राज्यात आहे. काँग्रेसने याबाबत आधीच आरोप केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपकडून ऑपरेशन लोटसची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रानंतर आता या राज्यात भाजपचं ऑपरेशन लोटस, या पक्षात मोठी फूट?
| Updated on: May 10, 2024 | 6:46 PM

महाराष्ट्रात भाजपने ऑपरेशन लोटस केल्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. शिंदे गट आणि अजित पवार गट भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले. तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट विरोधात राहिले. आता हरियाणात नवे राजकीय संकट तयार झाले असताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपवर ऑपरेशन लोटस चालवल्याचा आरोप केलाय. हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे. भाजपला पाठिंबा दिलेल्या तीन अपक्ष आमदारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले आहे. भाजप सरकारने बहुमत गमावल्याचा दावा जयराम रमेश यांनी केलाय.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी

हरियाणात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने नायबसिंग सैनी सरकार बरखास्त करावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी जयराम रमेश यांनी केलीये. या दरम्यान भाजप ऑपरेशन लोटस करेल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. हरियाणात भाजपचे दिवस आता संपले आहेत. नवी दिल्लीतही भाजपचे दिवस मोजले गेले आहेत. असंही ते म्हणाले.

शुक्रवारी काँग्रेसचे शिष्टमंडळ हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले. पण त्याआधीच राज्यपाल दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटू शकले नाही. राजभवनात पोहोचलेल्या काँग्रेस नेत्यांना गव्हर्नर हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महामहिम काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत.

फ्लोअर टेस्ट घेण्याची जेजेपीची मागणी

जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावून फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी केलीये. यावर उत्तर देताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांचे नवे मित्र दुष्यंत चौटाला हे अधिवेशन बोलावण्याची घाई करत आहेत. सरकारमध्ये आनंद घेतल्यानंतर ते आता सरकारमधून बाहेर पडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले आहे.

महिनाभरापूर्वीच काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणला होता. तेव्हा आम्ही बहुमत सिद्ध केले होते. पण गरज पडल्यास पुन्हा बहुमत सिद्ध करू असे ही मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस आणि दुष्यंत चौटाला यांनी बहुमताची चिंता करणे सोडून आगामी निवडणुकांची चिंता करावी, असे ही सैनी म्हणाले.

जेजेपीत फूट पडण्याची शक्यता

अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. जननायक जनता पक्षाने जे आधी भाजप सोबत सत्तेत होते त्यांनी ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र आता जेजेपीच अडचणीत आली आहे. कारण जेजेपीचे १० पैकी ७ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

जेजेपीचे दहापैकी सहा ते सात आमदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जेजेपीत फूट पडण्याची शक्यता आहे. जननायक जनता पक्षात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रमाणेच फूट पडू शकते. जेजेपीच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पाठिंबा देत आहेत. जेजेपीच्या तीन आमदारांनी माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांची पानिपतमध्ये भेट घेतलीये.