
सध्याच्या कलियुगात कुठल्याही नात्यावर तुम्ही डोळेझाकून विश्वास ठेऊ शकत नाहीत. इथे सख्ख्या नात्यांना सुद्धा आपलं म्हणता येणार नाही. अशीच एक माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या आईचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला. आईच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाने मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. कारण घरी मुलाच्या मुलाचा लग्न सोहळा होता. घरात मृतदेह आला, तर अपशकुन होईल असं या मुलाने म्हटलं. मुलाचं लग्न झाल्यानंतर चार दिवसांनी अंत्यसंस्कार करीन, तो पर्यंत चार दिवस आईचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवा असं धक्कादायक उत्तर या मुलाने दिलं. महिलेचा पती पत्नीचा मृतदेह गावी घेऊन गेला व घाट किनारी दफन केला. उत्तर प्रदेशच्या गोखरपुरमधील हे प्रकरण आहे.
गोरखपुर येथे राहणाऱ्या भुआल गुप्ता आणि त्यांची पत्नी शोभा देवी यांना 6 मुलं आहेत. तीन मुलगे आणि तीन मुली. शोभा आणि भुआल यांनी सर्वांची लग्न लावून दिली. काही वर्षात त्या मुलांना मुलं झाली. ते आजी-आजोबा बनलेत. एकवर्षापूर्वी भुआल आणि शोभाला मोठ्या मुलाने घराबाहेर काढलं. तुम्ही माझ्या घरावर ओझं बनलायत असं त्याने सांगितलं. मुलाचे शब्द मनाला लागले. दोघे नवरा-बायको घर सोडून निघून गेले.
तिथे त्यांना दारोदार भटकावं लागलं
घरातून मुलाने हाकलल्यानंतर शोभा आणि भुआलने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते राजघाट येथे गेले. तिथे एका माणसाने त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखलं. तिथे त्यांचं सर्व ऐकून घेतल्यानंतर त्या माणसाने पती-पत्नीला अयोध्या किंवा मथुरेला जायला सांगितलं. तेव्हापासून शोभा आणि भुआल दोघे एकत्र वृद्धाश्रमात राहतायत.
उत्तर ऐकून भुआल आतमधून पूर्णपणे कोसळले
शोभा यांचा मृत्यू झाल्यानंतर वृद्धाश्रमाचा हेड रवीने त्यांच्या छोट्या मुलाला फोन केला. रवीने सांगितलं की तुमच्या आईचं निधन झालय. अंत्यसंस्कार गोरखपुरमध्ये व्हावेत अशी आईची अंतिम इच्छा असल्याच सांगितलं. त्यावर मुलाने मोठ्या भावाच्या घरी त्याच्या मुलाचं लग्न आहे. त्याच्याशी बोलतो असं सांगून फोन ठेवला. त्यानंतर छोट्या मुलाने वृद्धाश्रमाला फोन करुन सांगितलं की, मोठ्या भावाने असं सांगितलय की आईचा मृतदेह चार दिवस फ्रिजरमध्ये ठेवा. मुलाचं लग्न कार्य पार पडल्यानंतर अंत्यसंस्कार करतो. हे उत्तर ऐकून भुआल आतमधून पूर्णपणे कोसळले. मुलींनी मृतदेह गोरखपूर येथे आणायला सांगितला. इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करु. भुआल मृतदेह घेऊन गोरखपुरला गेला. त्यावेळी मुलाने मृतदेह घरी घ्यायला नकार दिला. त्यानंतर गावकरी आणि इतर नातेवाईकांनी मिळून मृतदेह कैंपियरगंज घाटाजवळ दफन केला.