
पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे, पाकच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. भारताच्या या कारवाईनंतर आता पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भडकावू भाषण केलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमं आणि सोशल मिडीयातून अपप्रचार सुरू आहे, मात्र ते इतिहास बदलू शकत नाहीत, असं मुनीर यांनी म्हटलं आहे. त्यांनी हा संपूर्ण मुद्दा हिंदू-मुस्लिम समाजाकडे वळवतानाच द्विराष्ट्र सिद्धांताची थेरी मांडली.
जीवनाच्या प्रत्येक पैलूंचा विचार केला तर मुस्लीम हिंदूंपेक्षा वेगळे आहेत. मुस्लीम समाज धर्म, चालीरीती, परंपरा, विचार या सर्व मुद्द्यांवर हिंदू समाजापेक्षा वेगळा आहे. हिंदू आणि मुस्लीम ही दोन वेगळी राष्ट्रं आहेत. द्विराष्ट्र सिद्धांत हा नेहमीच पाकिस्तानच्या अस्तित्वाचा आधार राहिला आहे. आमच्या पूर्वजांनी स्वत:चं बलिदान देऊन पाकिस्तानची निर्मिती केली, त्यामुळे आमच्या देशाचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे. आम्ही प्रत्येक कृतीच सडेतोड उत्तर देऊ काश्मीर ही आमच्या गळ्याची नस आहे.आम्ही काश्मीरला कधीही विसरणार नाही, असंही मुनीर यांनी म्हटलं आहे. ते खैबर -पख्तूनख्वामधल्या काकुल येथे पाकिस्तानी सैन्य आकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये बोलत होते.
पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, दहशतवाद्यांनी नाव विचारत पर्यटकांवर गोळीबार केला, या गोळीबारामध्ये 26 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या हल्ल्यामध्ये दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. दरम्यान या हल्ल्यानंतर आता देशात संतापाची लाट आहे. या विरोधात भारत सरकारनं कठोर पाऊलं उचलली असून, पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे. पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला असून, त्यांच्या नेत्यांकडून सातत्यानं भडकावू वक्तव्य केली जात आहेत. आता लष्कर प्रमुख देखील असेच वक्तव्य करताना दिसत आहेत.